छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारविरोधात बंडाची तलवार उगारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट संघर्षयोद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शनासाठी हा चित्रपट होल्डवर ठेवला आहे. सेन्सॉर बोर्डाकडून आचार संहितेचे कारण देत चित्रपट प्रदर्शित होण्यापासून रोखण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नसल्याचं सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टी सुपरहिट होणार असल्याचं चित्रपट मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणारा अभिनेता रोहन पाटील याने सांगितलं. आचारसंहितेमुळे आता हा चित्रपट 21 जून 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने प्रदर्शित होईल, असं चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील तब्बल १७ दिवस उपोषणावर होते. यापूर्वी मराठा आंदोलनासाठी त्यांनी मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच केली होती. त्यावेळी सरकारने आश्वासनाचा कागद दिला, मात्र ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून घेण्याबाबत जरांगे पाटील ठाम होते. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाज त्यांच्या पाठिशी उभा आहे. मध्यतंरीच्या काळात त्यांच्यावर आरोपही झाले. मात्र तरीही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याबाबत जरांगे पाटील ठाम आहेत.