मुंबई- काँग्रेस आणि भाजपाच्या जाहीरनाम्यांनंतर प्रादेशिक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राष्ट्रासाठी राष्ट्रवादी, असं या जाहीरनाम्यातून जाहीर करण्यात आलेलं आहे. राज्यातील इतर प्रादेशिक पक्षांनी कोणताही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नसताना जाहीरनामा प्रसिद्ध करत अजित पवारांनी आघाडी घेतल्याचं मानण्यात येतंय. त्याचबरोबर या जाहीरनाम्यात अनेक मुद्दे हे भाजपा विरोधी असल्याचं स्पष्ट दिसतंय. यातून अजित पवारांनी महायुतीलाही भविष्याचे संकेत दिल्याचं मानण्यात येतंय.
काय आहे जाहीरनाम्यात
जाहीरनाम्यात विशेष करुन शेतकऱ्यांच्या किमान हमी भावाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. या मुद्द्यावर दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन वर्षांत दोन वेळा आंदोलन झालेलं आहे आणि हा मुद्दा केंद्राच्या अडचणीचा ठरलेला आहे. त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना करणार असं आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित झाला होता. याबाबत भाजपानं आत्तापर्यंत संभ्रमाची भूमिका घेतली आहे. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं थेट जातीनिहाय जनगणनेचं आशअवासन दिलेलं दिसतंय. याचबरोबर मुस्लीम समाजाला सोबत घेण्यासाठी काही आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलेली आहेत. जातीनिहाय जनगणनेचा प्रश्न मार्गी लावण्यासोबतच, कृषी, वीज, उद्योग यासह विविध क्षेत्रासाठी या जाहीरनाम्यात घोषणा करण्यात आल्यात.
जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे
- जातीनिहाय जनगणनेचा प्रश्न मार्गी लावणार
- यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न द्यावा यासाठी शिफारस करणार
3.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणार - शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत किमतीसाठी आग्रह
- कृषी पिक विम्याच्या व्याप्तीत वाढ
6 आपारंपरिक स्त्रोतांचा वापर करत वीजनिर्मिती
7 उद्योगांना प्राधान्य, - उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा,
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं याकरता पाठिंबा
आता इतर पक्षांचेही जाहीरनामे येणार
दिलीप वळसे पाटील यांच्या समितीनं हा जाहीरनामा तयार केलाय. काँग्रेस आणि भाजपानं राष्ट्रीय पातळीवर जाहीरनामे आधीच प्रसिद्ध केलेले असल्यानं मविआ किंवा महायुतीतल्या नेत्यांनी जाहीरनाम्याचा विचार फारसा केलेला दिसत नव्हता. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यानंतर मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनीही दिलेत. अमरावतीच्या सभेत बोलताना त्यांनी इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यातील वचनांची आठवण करुन दिली. गरज पडल्यास मविआचा जाहीरनामाही येत्या दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध करु असं ते म्हणालेत. इंडिया आघाडीनं जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील सर्व वचनं पूर्ण करण्यात येतील, अशी हमीही त्यांनी यावेळी दिलीय.
२०१९ साली कुणाकुणाचे जाहीरनामे?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. तर युतीत निवडणूक लढवलेल्या शिवसेनेनं भाजपाच्या जाहीरनाम्याचं कौतुक केलं होतं. राम मंदिर, ३७० कलम हटवणे या मुद्द्यांचा समावेश असलेल्या भाजपाच्या जाहीरनाम्याला शिवसेनेनं १०० पैकी २०० गुण दिले होते. गेल्या दोन वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जाहीरनाम्याचा विचार केला नसल्याचं दिसतंय. आता अजित पवारांनी यात पुढाकार घेतल्यानं, आणखी कुणाकुणाचे जाहीरनामे प्रसिद्ध होणार हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःमनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील ‘संघर्षयोद्धा’ होल्डवर