मुंबई : काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीसाठी धुळे आणि जालन्यामध्ये भाजपविरोधात मोठा डाव टाकला आहे . काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून जालन्यातून माजी आमदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांना तर धुळ्यातून माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना उमेदवारी दिली आहे .त्यामुळे आता कल्याण काळे भाजपच्या रावसाहेब दानवेंशी (Raosaheb Danve) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत . तर धुळ्यातून भाजपच्या सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांच्याविरोधात शोभा बच्छाव लढणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात बाजी कोण मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .तसेच या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ताकदवान आहेत. त्यामुळे या उमेदवारांच्या पराभावाचं कडवं आव्हान काँग्रेसला असणार आहे.
दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शोभा बच्छाव यांनी प्रतिक्रिया दिली आहे . त्या म्हणाल्या ,. मी धुळ्याची माजी पालकमंत्री असल्याकारणाने तेथील समस्या आणि प्रश्नांची जाणीव आणि माहिती आहे. मला कुठलेही आव्हान मोठं वाटत नाही. मला पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याचं समाधान वाटतंय. सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार. मी धुळ्याची लेक आहे तर बागलाणची सून आहे जनतेने संधी दिल्यास धुळे मतदारसंघाचा विकास करणार असे त्या म्हणाल्या . दुसरीकडे जालना लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसकडून यावेळी मोठी राजकीय खेळी करण्यात आली आहे. काँग्रेसने कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण काळे 2009 मध्येही काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे 1999 पासून या मतदारसंघात खासदार आहेत. असं असलं तरी त्यावेळी केवळ 8 हजार मतांच्या फरकाने कल्याण काळे यांचा पराभव झाला होता. याच कल्याण काळे यांना पुन्हा काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जालन्याची लढत भाजपसाठी यावेळी आव्हान असणार आहे .
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे . सध्या काँग्रेसचे कुणाल बाबा पाटील आमदार आहेत. त्यांचे वडील रोहिदास पाटील हे माजी मंत्री आहेत. याआधी शोभा बच्छाव या धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे त्यांची धुळे आणि नाशिकमध्ये ताकद आहे.. या मतदारसंघात एमआयएमचीसुद्धा ताकद आहे. कारण मुस्लीम बहुल मतदारसंघात एमआयएमने आपली ताकद निर्माण केली आहे. विशेष म्हणजे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार फारुक अन्वर शाह हे एमआयएम पक्षाचे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. याशिवाय एमआयएमकडून नेमकी कुणाला उमेदवारी देण्यात येते? ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय या धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.