नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर दिल्लीतील आप सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यानुसार, भाजपच्या एका नेत्याने अलीकडेच दिल्लीच्या 7 आमदारांशी संपर्क साधला आणि काही दिवसांनी केजरीवालांना अटक करू आणि त्यानंतर आमदार फोडू असं सांगितलं.
केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, भाजपने आपच्या 7 आमदारांना सांगितलं की, 21 आमदारांशी चर्चा झाली आहे. तसेच इतर आमदारांशी संपर्कात आहोत. त्यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडू. तुम्ही पण येऊ शकता. 25 कोटी देणार आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवा.
केजरीवाल पुढे म्हणाले की, भाजपचा दावा आहे की त्यांनी आमच्या 21 आमदारांशी चर्चा केली आहे, परंतु आमच्या माहितीनुसार ते 7 आमदारांशी बोलले आहेत आणि सर्व 7 आमदारांनी भाजपची ऑफर नाकारली आहे. भाजप नेत्याचे हे संभाषण रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. भाजप कोणत्याही दारू घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मला अटक करू इच्छित नाही तर दिल्लीतील सरकार पाडण्याचा कट रचत आहे. गेल्या 9 वर्षात त्यांनी आमचे सरकार पाडण्यासाठी अनेक कारस्थानं केली, पण त्यांना यश आलं नाही. देव आणि लोकांनी आम्हाला नेहमीच साथ दिली.