पुणे
ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर संताप व्यक्त केल्यानंतर आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ही फसवणूक ओबीसींची की मराठा समाजाची हे येत्या काळात स्पष्ट होईलच. या निर्णयाविरोधात राज्यभरात आक्रोश आंदोलन करू आणि मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या अध्यादेशाची होळी करू असं शेंडगे यावेळी म्हणाले.
आता ओबीसी आरक्षणाचं वर्गीकरण आणि विभाजन होईल. जो कुणबी दाखला घेईल तो पुन्हा मराठा होऊ शकत नाही. तुम्ही पुन्हा ९६ कुळी मराठा म्हणून घेऊ शकत नाही. कुणबीमध्ये दाखल झाला की राज्यातील मराठा समाजाच्या जमातीचे अस्तित्व संपुष्टात येईल अन् राज्यात मराठा समाज उरणार नाही. आता कुणबी की तू का मेळवावा असं करावं लागेल”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
आपल्याकडे पितृसत्ताक संरचना आहे. सगेसोयऱ्यात आईकडील नातेवाईकांचाही समावेश होतो. मात्र मराठा आरक्षणाअंतर्गत याचाही अध्यादेशात समावेश करण्यात आला आहे. आम्ही कोर्टात याच्याविरोधात जाऊ, आम्ही राज्यपालांना भेटणार आमच गाऱ्हाणं मांडणार, राज्य सरकारने आमची फसवणूक केली आहे. कारण हे घटनेत बसत नाही. हा घटनेशी धोका आहे, अशा शब्दात शेंडगे यांनी संताप व्यक्त केला.
आज सकाळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाचा निषेध केला. यानंतर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनीही या निर्णयासाठी राज्य सरकारचा निषेध केला.