मुंबई : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे . येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. पण त्याआधी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका होणार आहेत .यासाठी भाजपच्या गोट्यात हालचाली वाढल्या असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule )दिल्लीत गेले असल्याची माहिती समोर आली आहे . आज मध्यरात्री त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे. यामध्ये पाच जणांची नावे निश्चित करण्यात येणार आहेत . त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे .
मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या वाट्याला येणाऱ्या पाच जागांसाठी ३५ जणांनी उमेदवारी मागितली होती . या 35 जणांच्या पैकी पाच जणांची नावे फायनल केली जाणार आहेत . दरम्यान राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला या बैठकीत जर परवानगी मिळाली तर 27 जूनला अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. (Bjp News)विधान परिषद निवडणूक 12 जुलै रोजी होणार असून यासाठी 25 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे लवकरच नावे निश्चित केली जाणार असल्याचे समजते. या नावाची अधिकृत घोषणा लवकरच दिल्लीतून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे .
मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सावंत (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे.