Twitter : @therajkaran
नागपूर
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक (Nawab Malik) सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे त्यांनी अजित पवार गटाचं नेतृत्व मान्य केलं असून आता ते महायुतीत सामील होतील, अशी चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्राने अनेकांना (Devendra Fadnavis refused) धक्का बसला आहे.
नवाब मलिकांना महायुतीत सामील करून घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट नकार दिला आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र (Letter to Ajit Pawar) लिहून आपला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सध्या तरी नवाब मलिकांसाठी महायुतीची दारं बंद असल्याचं दिसून येत आहे.
फडणवीसांनी पत्रात लिहिलंय…
नवाब मलिकांवर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.

मलिकांवर काय आहेत आरोप?
- कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार
- दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सदस्यांसोबत नवाब मलिकांनी संगनमत करून कुर्लामधील मुनिरा प्लंबर या महिलेची गोवावाला कंपाऊंड ही जमीन हडप केली. त्याच कटांतर्गत दाऊद टोळीच्या सदस्यांनी मुनिरा यांना फसवून कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले आणि अवैधरित्या जमीन ताब्यात घेऊन जमिनीच्या मोबदल्याचे पैसे अन्यत्र वळवले.