मुंबई
अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याने आता देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे. विरोधकांकडून फडणवीसांचे जुने व्हिडीओ समोर आणले जात आहेत. यात एकेकाळी देवेंद्र फडणवीसांनी आदर्श घोटाळ्यावरुन अशोक चव्हाणांवर टीकास्त्र सोडलं होतं. आज त्यांचाच भाजप प्रवेश होत असल्याने भाजपवर बोट ठेवलं जात आहे.
आदर्श घोटाळा आणि सिंचन घोटाळा कसा झाला यावर बोलतानाचा देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ संजय राऊतांनी ट्विट केला आहे. हा पैसा गेला कोठे, असा सवाल त्यांनी फडणवीसांना विचारला आहे. याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही देवेंद्र फडणवीसांचा २०१४ मधील एक व्हिडीओ रिट्विट केला आहे.
मतदान करण्यापूर्वी आदर्श घोटाळ्याची सत्यता पाहा, अशा आशयाचा तो फडणवीसांच्या टीमकडून तयार करण्यात आलेला व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना ‘कोण होतास तू, काय झालास तू अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे.
दरम्यान ईडी, सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून केवळ विरोधी नेत्यांवर दबाव आणला जात आहे. एका प्रकारे ब्लॕकमेल करण्यात येत आहे. पक्षांतील नेत्यांना धमकावून स्वतःकडे वळविण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. म्हणूनच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असे आमदार शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे. .