Twitter : @vivekbhavsar
मुंबई
महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्यातील शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अत्यंत प्रामाणिक आणि चारित्र्यवान म्हणून ओळखले जातात. ते प्रामाणिक असले तरी काही लोक त्यांच्या नावाचा वापर करून दुकान थाटून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस सहसा चिडत नाहीत आणि चिल्लर बाबींकडे दुर्लक्ष करतात. पण, जेव्हा एखाद्या प्रकरणात त्यांच्या नावाचा गैरवापर होतोय, हे त्यांच्या लक्षात येते तेव्हा त्या व्यक्तीचे करीअर संपते. असे राजकीय उदाहरणे राज्याने गेल्या आठ – नऊ वर्षात बघितली आहेत.
राजकारणात टिकून राहण्यासाठी कार्यकर्ते सांभाळावे लागतात. एखाद्या नगरसेवक, आमदार, खासदाराच्या कार्यालयात सकाळपासून कार्यकर्त्यांची रिघ असते, अनेक लोक भेटायल येत असतात. त्यांना किमान चहा पाजावा लागतो. खास तरुण कार्यकर्त्यांना धाब्यावर न्यावे लागते. हा सगळं खर्च आमदार, खासदाराला मिळणाऱ्या मासिक वेतनापेक्षा जास्त असतो. सगळीकडेच मुंबई पुण्यासारखी परिस्थिती नाही, जिथे निवडून आलेला नगरसेवक पुढील काही महिन्यात फॉरचुनर गाडी घेऊन फिरतात. छोट्या शहरात कार्यकर्त्यांचा खर्च भागवणे कठीण असते, अशा वेळी नेत्याला सांगून अधिकाऱ्यांच्या खास करून पोलिस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून घेणे आणि त्या मोबदल्यात “टोल” घेणे, हा एकमेव पर्याय अशा स्थानिक नेत्यांकडे असतो.
अर्थात, “टोल” भरून बदली करून बसलेला अधिकारी किमान चार पटीने वसूली करतो. अशा प्रकारचा “व्यवहार” हा अगदी सर्वमान्य झाला आहे. याबद्दल कोणालाही काही गैर वाटत नाही. अडचण तेव्हा होते, जेव्हा देवेंद्र फडणवीस सारखा नेता केवळ कार्यकर्ता आणि पदधिकारींकडे बघून “टोल” न घेता बदली करून देतात आणि संबंधित अधिकारी वर “साहेबा”ला पोहोचवावे लागते, असे सांगून वसूली करताना “साहेबा”ला बदनाम करत असतात.
धुळ्याचे विद्यमान पोलिस आधीक्षक संजय बारकुंड (Dhule SP Sanjay Barkund) यांच्याबद्दल स्थानिक पातळीवर अशाच तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेशला लागून असलेले काही गावे हे देशी बनावटीचे पिस्तूल, रायफल आणि बंदूक बनवण्याचे केंद्र बनले आहे. तर याच परिसरात अक्षरश: शेकडो एकरवर गांजाची शेती केली जात आहे. ठाणे, मुंबईतील पोलिसांच्या पथकाने धाड टाकून शिरपूर तालुक्यात मोठी शस्त्रास्त्र जप्त केली आणि टोळीला अटक केली. तर मोठ्या प्रमाणात गांजाही वेवेळी बाहेरील जिल्ह्यातील पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
अन्य जिल्ह्यातील पोलिसांना धुळ्यात बेकायदा शस्त्रास्त्र निर्मिती केली जात असल्याची खबर मिळते, मग धुळ्याचे पोलिस झोपून होते का? असा प्रश्न उपस्थित होतो. हे पोलिसांची खबरी म्हणून काम करणारी एल सी बी विभागाचे अपयश आहे, असे म्हणण्यास वाव आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड आणि एल सी बी यांच्यात काही वाद आहेत का? की धुळे पोलिसांचे लक्ष कारवाई करण्याऐवजी केवळ “वसुली”कडे अशी शंका यावी, अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे, पोहोचवली जात आहे.
स्थानिक पातळीवरील बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात “टोल” वसूली केली जात असल्याचे आरोप भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते करत आहेत. आश्चर्य म्हणजे यातील काही स्थानिक नेतेच या पोलिस अधीक्षक यांना धुळ्यात आणण्यासाठी आग्रही होते, असे सांगितले जाते. यातील दोन नवे अत्यंत ठळक आहेत, पण ते सिद्ध करणे शक्य नसल्याने ते इथे लिहिणे संयुक्तिक ठरणार नाही. मात्र, यातील एका जिल्हास्तरीय नेत्याने अगदी काही दिवासपूर्वीच गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या विरोधातील पाढे वाचून दाखवले आहेत, अशी खात्रीशीर माहिती आहे.
या तक्रारीची गृहमंत्र्यांनी गांभीर्याने दाखल घेतल्याचे सांगितले जाते. याचे कारण असे आहे ही, गृहमंत्री फडणवीस यांच्या नावाचा वापर करून बदल्यांचे “व्यवहार” केले जात आहेत. छोट्या – छोट्या बादल्यांसाठी मोठ मोठे “टोल” द्यावे लागत आहेत. एकाकडून टोल घेऊन बदली केली तरी दुसऱ्याने “टोल” वाढवून दिला तर पाहिल्याची मुदतपूर्व बदली केली जात आहे, शिवाय भरलेला टोल विसरायचा, असे सांगितले जात आहे. हा धुमाकूळ घातला जात असून पोलिस प्रशासनाचे प्रमुख म्हणून याला पोलिस अधीक्षक जबाबदार आहेत, अशा तक्रारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या जात आहेत. “टोल” वसुलीसाठी काही एजंटही नेमले गेल्याच्या तक्रारी आहेत.
एल सी बी च्या “त्या” अधिकाऱ्याचीही चौकशी व्हावी
हे बिंग बाहेर येण्याचे कारण ठरले, ते एल सी बी च्या एका अधिकाऱ्याची दोनदा झालेली मुदतपूर्व बदली आणि त्यापोटी बुडालेला “टोल”. जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गांजा, अवैध शस्त्रास्त्रे बनवण्याचे कारखाने बिनबोभाट सुरू राहणे यासाठी ज्याप्रमाणे पोलिस आधीक्षक जबाबदार आहेत, तसेच गोपनीय माहिती पुरवणारी एल सी बी , जीला पोलिस आधीक्षकांचा उजवा कान समजले जाते, ती देखील जबाबदार आहे, असे म्हणत येऊ शकेल. अर्थात, या घटनेतील एल सी बी चा अधिकारी फार मोठ्या आणि महत्वाच्या पदावर नाही, पण “टोल” च्या रकमा ऐकून हे कनिष्ठ अधिकारी लक्ष्मीपती कसे झाले असतील, अशी शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधीक्षक आणि या अधिकाऱ्याचीही चौकशी करावी आणि योग्य ते कायदेशीर पावले उचलावेत, हीच अपेक्षा.
विवेक भावसार
संपादक
राजकारण
(The Rajkaran)
Cell : 9930403073