महाराष्ट्र ताज्या बातम्या

निसर्ग जीवन देतो, पण नोट आणि वोट देत नसल्याने सर्वाधिक धोक्यात — धीरज परब

Environmental activist Dhiraj Parab speaking on environmental destruction in Konkan

पर्यावरण संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे नव्हे, तर अस्तित्वातील झाडे वाचवण्यासाठी जनचळवळ उभी राहण्याची गर

कुडाळ: “आजच्या बदललेल्या व्यवस्थेत नोट आणि वोट या दोन गोष्टींनाच सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. निसर्ग आणि शुद्ध पर्यावरण आपल्याला जीवन देतात, मात्र त्यांच्याकडून नोट आणि वोट मिळत नसल्याने निसर्गच सर्वाधिक धोक्यात आला आहे,” असे स्पष्ट मत पर्यावरण कार्यकर्ते Dhiraj Parab यांनी व्यक्त केले.

कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृहात रविवारी आयोजित नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या पाचव्या राष्ट्रीय पर्यावरण संमेलनात ते बोलत होते. गेली २२ वर्षे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सातत्याने कार्य केल्याबद्दल यावेळी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

धीरज परब म्हणाले की, “फक्त ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे म्हणण्याची वेळ आता संपली आहे. अस्तित्वातील झाडे वाचवण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभे राहिले पाहिजे. कारण नवीन झाडे मोठी होईपर्यंत एक पिढी निघून जाईल.”

झाडे लावल्यानंतर फोटो आणि व्हिडिओपुरतेच अभियान मर्यादित राहते, त्यानंतर ती झाडे जगली की नाही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पर्यावरण संरक्षणासाठी जागरूक नागरिकांनी अधिक आक्रमक आणि संघटित भूमिका घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरकार, प्रशासन आणि राजकारण हे बिल्डर, उद्योजक आणि ठेकेदारांच्या आर्थिक हितासाठी काम करत असून, त्यासाठी निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर बळी दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “शाळेत झाडांचे महत्त्व शिकवले जाते, मात्र मोठे झाल्यावर अनेकजण ती शिकवण विसरतात,” असे ते म्हणाले.

देशातील जंगल क्षेत्र झपाट्याने कमी होत असून प्रदूषणामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल आणि वाढते तापमान यांचे गंभीर परिणाम मानवी आरोग्य व शेतीवर होत असल्याचे सांगितले.

पर्यावरण संरक्षण कायद्यातील दंडात्मक तरतुदी कमकुवत करण्यात आल्याने पर्यावरणाची हानी करणे अधिक सोपे झाले असल्याची टीकाही त्यांनी केली. “कोकणातील निसर्ग अशाच पद्धतीने नष्ट होत राहिला, तर निसर्गरम्य कोकण भकास होण्यास वेळ लागणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

“आपली वाटचाल शाश्वत विकासाकडे नसून शाश्वत विनाशाकडे सुरू आहे,” असे परखड मत व्यक्त करत त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक कृतीची गरज अधोरेखित केली.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात