अकलूज : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पावर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे तिन्ही नेते अकलूज येथे एकत्र येणार असून यावेळी माढा, सोलापूर, बारामती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती आहे.
तब्बल १४ वर्षांनंतर पवार, शिंदे, मोहिते एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील आणि अन्य नेते मोहिते-पाटील यांच्या घरी स्नेहभोजनासाठी एकत्र येणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी २००९ मध्ये अकलूज येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभावेळी ही तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर होते.
मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला राम राम करीत पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचं निश्चित झालं आहे. त्यासाठी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आज स्नेहभोजनासाठी शिवरत्नवर येणार असून डिनर डिप्लोमसीतून माढा, सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील राजकारणातील ताकदवान घराणं म्हणून मोहिते-पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील कुटुंबाचे कायम एकछत्री वर्चस्व राहिले आहे. १९८० पासून मोहिते-पाटील राज्याच्या राजकारणात सक्रिय राहिले आहे. त्यापूर्वी त्यांनी रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, अशी स्थानिक स्वराज्य संस्थांची धुरा सांभाळली. शंकररावर मोहिते-पाटील यांच्या निधनानंतर १९८० मध्ये माळशिरस मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील पहिल्यांदा आमदार झाले. १९८० ते २००९ असं जवळपास २९ वर्षे ते माळशिरसचे आमदार होते. त्यांचा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. शरद पवारांना माढा लोकसभा निवडणुकीत यश मिळवून देण्यात विजयसिंह मोहिते यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेतील माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याशिवाय विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशिल मोहिते पाटील यांनीही भाजपची वाट धरली होती. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी त्यांची भेट घेतली होती. दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशिल मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. आज ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.