मुंबई : महायुतीविरोधात कंबर कसलेल्या महाविकास आघाडीची पकड हळूहळू सैल होत असताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाने लोकसभेसाठी १७ उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचे महाविकास आघाडीसोबत ६ जागांवर चर्चा सुरू असताना त्यांनी थेट ८ उमेदवारांची घोषणा करीत एकला चलो नाराच दिला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना फेरविचाराची विनंती केली आहे. चर्चा सुरू असतानाच परस्पर उमेदवारांची घोषणा करणे हा युती धर्माचा अपमान असल्याची टीका काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे. काल २७ मार्च रोजी संजय निरूपम यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली. तर काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही आपला आक्षेप नोंदवला.
उद्धव ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता परसली आहे. येथून काँग्रेसचे विशाल पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यापूर्वीच ठाकरे गटाने या जागेवरुन उमेदवाराची घोषणा केली. ठाकरे गटाकडून आणखी ५ उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे.
उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी त्याला विरोध केला होता. खिचडी चोर अमोल किर्तीकर यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच आपल्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. गेल्या पाच वर्षांपासून आपण या मतदारसंघात काम करीत असल्याचे सांगत संजय निरूपमांना उत्तर पश्चिम मुंबई या जागेवरून उमेदवारीची अपेक्षा होती. त्यामुळे काल पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. ‘काँग्रेसच्या नेतृत्त्वाने नेहमीच भ्रष्ट्राचाराविरोधात आवाज उठवला आहे. परंतु, आता ज्या उमेदवारावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्याच उमेदवाराला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचा जनाधार नाहीय. अशा कमी जनाधार असलेल्या पक्षासमोर काँग्रेसने झुकणं हे श्रद्धांजली लिहिण्याचा कार्यक्रम सुरू झालाय, असं दिसतंय’, अशा शब्दात निरूपमांनी आपला राग व्यक्त केला. यावर नाना पटोलेंनीही प्रत्युत्तर दिलं. ‘निरूपम यांच्या शब्दाला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, स्वतःचा स्वार्थ साधला गेला नाही म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे निषेधार्थ आहे अशी टीका त्यांनी केली. लोकशाहीची श्रद्धांजली करण्याचं भाजपने जे काम सुरू केले आहे त्याच्यावर तुटून पडण्याची ही वेळ आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

तर दुसरीकडे शरद पवार मतदारसंघातील खाचखळगे दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आधीपासून काँग्रेस आणि वंचितचे एकमेकांच्या विरूद्ध दिशेला असलेले चेहरे आणि आता ठाकरे गटावरही काँग्रेसची नाराजी यामुळे महाविकास आघाडी विस्कळीत होताना दिसत आहे.