मुंबई- महायुतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारंसघाचा उमेदवार अखेर ठरलाय. अपेक्षेप्रमाणे हा मतदारसंघ महायुतीत भाजपाला सुटलेला आहे. केंदद्रीय मंत्री नारायण राणे हेच या मतदारसंघातून उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. विनायक राऊत यांना रोखण्यासाठी नारायण राणे यांनीच मैदानात उतरावं असा भाजपा पक्षश्रेष्ठींचा आग्रह होता. स्वत: नारायण राणे मात्र ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर भाजपाच्याच प्रमोद जठार यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र राणे यांचा प्रभाव संपूर्ण लोकसभा मतदारसंघावर असल्यानं त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. येत्या दोन दिवसांत राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल.
किरण सामंतांचं काय?
रत्नागिरी -सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघावर गेली कित्येक वर्ष शिवसेनेचीचच सत्ता होती. त्यामुळे स्वाभाविकच शिंदेंच्या शिवसेनेचा या मतदारसंघावर दावा होता. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याची तयारीही सुरु केली होती. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असलेले नेते अशी किरण सामंत यांची ओळख आहे. त्यांचे सर्वपक्षीयांशी चांगले संबंधही आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी दोन वेळा नारायण राणे यांचीही भेट घेतली होती. मात्र भाजपा पक्षश्रेष्ठींनी आपला कौल राणेंच्या पारड्यात टाकल्याचं मानण्यात येतंय.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा इतिहास काय?
आधीचा राजापूर मतदारसंघ पुनर्रचनेनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग म्हणून ओळखण्यात येऊ लागला. १९८९ पर्यंत हा मतदारसंघ समाजवाद्यांचा बालेकिल्ला मानण्यात येत होता. १९९१ पासून ही जागा शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेकडे आली. १९९१ आणि २००९ चा अपवाद या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवारच विजयी झालेला आहे. १९९१ मध्ये काँग्रेसचे सुधीर सावंत, २००९ मध्ये निलेश राणे विजयी झाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये विनायक राऊतांकडून निलेश राणे यांचा पराभव झालेला आहे. सलग तिसऱ्यांदा राणे विरुद्ध शिवसेना लढत होणार आहे. मात्र यावेळी नारायण राणे हे रिंगणात असून ते महायुतीच्या तिकीटावर लढणार आहेत. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणार असं मानण्यात येतंय. दीर्घ राजकीय कारकीर्द असलेल्या नारायण राणेंसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असल्याचं मानण्यात येतंय. शिवसेना फुटल्यानंतर हा मतदारसंघ पदरात पाडून घेण्यात भाजपला यश आलेलं आहे. २०१४ च्या विधानसभेतील पराभवानंतर राणे प्रथमच लोकसभेच्या मैदानात दिसणार आहेत.
हेही वाचाःठाकरे गटाकडून 17 तर वंचितकडून 8 उमेदवारांची घोषणा; मविआ कसा ठरवणार जागावाटपाचा फॉर्म्युला?