परभणी – दुसऱ्या टप्प्यातील प्रचार बुधवारी संध्याकाळी संपला. आता शुक्रवारी राज्यातील ८ जागी मतदान होणार आहे. जाहीर प्रचार थंडावला असला तरी पुढचे काही तास हे संपर्कासाठी आणि छुप्या प्रचारासाठी महत्त्वाचे मानले जातात. याच काळात परभणीत रात्री महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या गाडीची तपासणी काही तरुणांनी केल्यानं खळबळ उडालीय. महादेव जानकर त्यावेळी गाडीत नव्हते. मात्र गाडीचे चालक आणि जानकरांचे पीए त्यावेळी गाडीत होते. अशी तपासणी योग्य नसल्याची भूमिका घेत जानकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांनी जवळच्या पोलीस स्टेशन गाठून त्याठिकाणी ठिय्या आंदोलनच केलं. गाडी तपासणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शिवसैनिकांनी गाडी तपासल्याचा आरोप
परभणीत देशमुख हॉटेलजवळ काही तरुणांनी जानकरांची गाडी तपासली. पोलीस किंवा निवडणूक आयोगाच्या यंत्रणेनं गाडी न तापसता काही तरुणांनी हा प्र्कार केला. यामुळं संतप्त झालेल्या जानकरांनी थेट पोलीस ठाणं गाठलं. तपासणी करणारे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक असल्याचा आरोप करत, तातडीनं या प्रकरणात त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
गुन्हा दाखल
या सगळ्या प्रकारात परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी हेही रात्रभर पोलीस ठाण्यात बसून होते. तरुणांनी कोणताही अधिकार नसताना गाडीची तपासणी अयोग्य असल्याचं मान्य करत या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील कारवाईचं आश्वासनही त्यांच्यावतीनं देण्यात आलंय. परभणीत ठाकरेंच्या सिवसेनेचे संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर अशी लढत होतेय. तर वंचितच्या वतीनं पंजाब डक या ठिकाणाहून रिंगणात आहेत.
हेही वाचाःशिंदे गटाचे नेते भुमरेंच्या पत्नीच्या नावावर दारूचे परवाने; माहिती दडवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप