मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा, बैठकांना जोरदार वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप(Bharatiya Janata Party ) , मोदी सरकार आणि फडणवीसांवर कडाडून टीका केली आहे .याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पवार साहेबांनी किती कोलांट्या उड्या मारल्या याचे व्हिडीओ दाखवले, तर अवघड होईल, असं म्हणत त्यांच्यावर टीका केली होती . त्याला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस काय म्हणतात त्याला अर्थ नाही. आपला पराभव होतोय हे आता त्यांच्या ( भाजपच्या) लक्षात येतंय अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे .
लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना कालच सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi)सभा झाली. यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हीडिओ दाखवत त्यांचं जुनं भाषण ऐकवलं. गेले दहा वर्षे मोदींच्या हातात देशाचा कारभार आहे. त्यांनी दरवेळी आपल्या भाषणात अनेक आश्वासनं दिली कि मी महागाई कमी करणार. 50 दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत 5 रुपयाच्या खाली आणणार 2014 आधी पेट्रोलची किंमत 72 रुपये होती. पण आज 106 रुपये किंमत आहे. निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत. लोकांची फसवणूक सुरु आहे, असं शरद पवार म्हणाले.तसेच मोदी असोत किंवा अमित शाह अथवा इतर कोणी, त्यांच्या भाषणात सतत फक्त माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर टीका होत असते. यावरून कळतं कि त्यांचा पराभव होऊ लागला आहे . त्यामुळे ते वारंवार महाविकास आघाडीवर टीका करत आहेत . असा हलालबोल त्यांनी चढवला आहे .
दरम्यान आज शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आणि प्रचारगीत प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी धाराशिवमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे . ते म्हणाले , आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा गेल्या १० वर्षांपासून तुम्ही काय केलं ?त्याचा लेखाजोगा आधी लोकांसमोर मांडा, उगीच मागच्या गोष्टी काढू नका, असं पवारांनी सुनावलं. त्यांच्याकडे मांडायला काही नाहीच, लोकांना सांगायला काही नाही म्हणून ते असे आरोप करत आहेत, (त्यांच्याकडे) दुसरे काही उद्योग नाहीत अशी टीकाही शरद पवार यांनी केली.