ताज्या बातम्या महाराष्ट्र

क्राऊड पुलर राज ठाकरेंना युतीसोबत घेण्याचे प्रयत्न

 मनसेचे इंजिन दिल्लीत धडकणार का?

X: @therajkaran

लोकसभेबाबतची (Lok Sabha elections) भूमिका लवकरच जाहीर करू असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनेक वेळा सांगितले असले तरी मनसेने (MNS) लोकसभा निवडणुकीतच महायुतीसह (Mahayuti) संसार थाटावा यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच (Shiv Sena) जास्त उत्सुक आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मनसे सोबत आलीच तर राज ठाकरे यांच्या रूपाने, पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी क्राऊड पुलर स्टार प्रचारक (Crowd puller Star campaigner) शिवसेनेला मिळणार आहे, आणि सेनेला अशा नेत्याची गरज आहेच , हे देखील सत्य आहे.

शिवसेनेच्या महाफुटीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सहकाऱ्यांनी  भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. कदाचित शिंदे – फडणवीस यांच्या व्यतिरिक्त कोणालाही माहीत नसेल असे सर्वांनाच धक्का देत राज्याचे मुख्यमंत्रीपदही मिळवले. पण हे पद म्हणजे काटेरी मुकुट आहे याची कल्पना मनाप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार देखील करू न शकणाऱ्या शिंदे यांना थोड्याच कालावधीत आली असेल. आपल्या सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी त्यांना अजित पवार (Ajit Pawar) युतीत सामील होईपर्यंत वाट बघावी लागली होती ही वस्तुस्थिती आहे. अर्थात एक, दोन नव्हे तर तब्बल चाळीस आमदार आणि तेरा खासदार यांना आपल्या बाजूने वळवायचे, एकमुखाने नेतृत्व मान्य करायला लावायचे आणि शिवसेनेसारखा पक्ष फोडायचा, यासाठी लागणारे कसब व धैर्य केवळ एकनाथ शिंदे या संघटना बांधणीत वाघ असणाऱ्या नेत्याच्या अंगीच आहे, हे पण निर्विवाद सत्य आहे. सामान्य कार्यकर्त्यांचा नेता, जनसामान्य माणसाचा मुख्यमंत्री, जनतेत राहणारे नेतृत्व ही कौतुकास्पद प्रतिमा म्हणूनच शिंदे यांच्या नशिबी आली आहे.

पण निवडणुका लढवणे म्हणजे फक्त एवढेच नाही. प्रत्येक मतदारसंघात वेगळी गणितं असतात, तिथल्या नागरिकांची नाडी पकडायची म्हणजे केवळ शासन आणि प्रशासन चालवणे नाही. प्रचाराच्या ऐन धामधुमीत समोरच्या जनतेला एका जागी खिळवून ठेवणारा नेता निवडणुकीत मोठा घटक असतो,  त्या- त्या पक्षासाठी असा नेता जवळ असणे म्हणजे मोठे अस्त्र ठरते. निवडणुकांची राळ उठवायला, वातावरण निर्मितीसाठी अशा क्राऊड पुलर नेत्याची प्रत्येक पक्षाला आत्यंतिक गरज असते. सभांना होणारी गर्दी मतदानात किती परावर्तित होते हे जरी निर्णायक असले तरी या सभांचे महत्व मात्र अबाधितच असते. अर्थात शिवसेनाप्रमुखांच्या (Shiv Sena Supremo Late Balasaheb Thackeray) सभांना लाखोंचा जनसमुदाय लोटायचा पण सत्तेवर यायला शिवसेनेला १९९५ साल उजाडले हे देखील नाकारून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्यातील ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे भाजपचे स्टार प्रचारक असले तरी, संपूर्ण महाराष्ट्रात फिरणारा, एकहाती सभा घेणारा नेता शिवसेनेकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त कोणीही नाही ही वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे लोकसभेच्या मुहूर्तावरच राज ठाकरे यांना महायुतीकडे वळवायचे आणि विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपर्यंत एक मजबूत गठबंधन राज्यात निर्माण करायचे, याकडे महायुतीची पावले पडत आहेत. काँग्रेस (Congress) बरोबर केवळ सत्ता मिळवण्यासाठी गेलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निर्णयावर अनेक सामान्य शिवसैनिक (Shiv Sainik) नाराज आहेत, राज्यभरात देखील जनतेला हे पटलेले नाही. भाजप-सेना युती (BJP – Shiv Sena alliance) म्हणून, काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही मतदान केले असा काहीसा सूर जनतेत आहे. त्यातच शिंदे यांनी पाडलेल्या शिवसेनतील फुटीनंतर (Split in Shiv Sena) हाच सामान्य शिवसैनिक, मतदार उद्धव ठाकरेंना पर्याय म्हणून राज ठाकरे यांच्याकडे देखील वळू शकतो, हे चाणाक्ष फडणवीस यांनी ओळखले आहे. त्यामुळे अगदी थेट जास्त जागा जरी देता आल्या नाहीत, ते गणित जमलेच नाही तर किमान एखाद दुसरी महत्त्वाची जागा लोकसभेला मनसेसाठी सोडता येऊ शकते का, राज ठाकरे अशा प्रस्तावाला मान्यता देतील का, याची चाचपणी महायुतीकडून आधीच सुरू झालेली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण मुंबईची (South Mumbai) जागा मनसेसाठी सोडावी आणि तिथून एकेकाळचे जायंट किलर मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी महायुतीकडून लढावावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. येथे उबाठा गटाचे अरविंद सावंत (MP Arvind Sawant) विद्यमान खासदार आहेत. त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या सहाय्याने ४,२०,५३० (५४%) मते मिळवली होती, तर काँग्रेसच्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांना ३,२१,३६२ (४१%) मतं मिळाली होती. या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या वरळी (Worli) आणि शिवडी विधानसभा (Sewri assembly constituency) मतदारसंघात उबाठा गटाचे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) व अजय चौधरी हे आमदार आहेत.  भायखळा येथून यामिनी यशवंत जाधव या शिवसेनेच्या आमदार आहेत, तर मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) व कुलाब्यात राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे भाजपचे आमदार आहेत. एकमेव मुंबादेवी येथून काँग्रेसचे अमीन पटेल हे निवडून आले आहेत. 

लोकसभा निवडणुकीत सेना – भाजपच्या अरविंद सावंत यांना वरळी, शिवडी, मलबार हिल आणि कुलाबा या मतदारसंघात आघाडी मिळाली होती तर काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना भायखळा व मुंबादेवी येथून आघाडी मिळाली होती. हे दोन्ही मतदारसंघ मुस्लिम बहुल आहेत. या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात तब्बल साडेतीन लाखाच्या घरात, म्हणजेच सुमारे २१% मतदार हा मुस्लिम आहे.  विधानसभेला यशवंत जाधव यांच्या वैयक्तिक संबंधामुळे येथून मुस्लिम पट्ट्यात देखील त्यांनी मते मिळवली होती, पण लोकसभेला मिलिंद देवरा स्वतः उमेदवार असल्याने ही एकगठ्ठा मते सावंत यांना न पडता देवरा यांच्या पारड्यात पडली. मनसेचे बाळा नांदगावकर हे, शिवडी, भायखळा याच पट्टयातून पुढे आलेले सर्वमान्य नेतृत्व आहे. धर्म आणि पक्षविरहित असणारे त्यांचे संबंध ही मनसेसाठी जमेची बाजू आहे. एआयएमआयएमने (MIM) देखील भायखळा व मुंबादेवी या दोन विधानसभा मतदारसंघात नशीब अजमावले होते, त्यांना दोन्ही मतदारसंघात मिळून पाच टक्के मते मिळाली होती.

भाजपच्या राहुल नार्वेकर यांनी स्वतःला उमेदवार समजून या मतदारसंघात काम सुरू केले आहे. त्यांना उमेदवारी देता यावी म्हणूनच शिवसेनेच्या मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेने ही जागा मागून परत देवरा यांनाच उतरवणे हे जरा अशक्यच वाटत आहे. अर्थात राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीबरोबर आला आणि जर खरंच त्यांनी दक्षिण मुंबई ही लोकसभा लढवली तर उबाठाच्या अरविंद सावंत यांची डोकेदुखी निश्चितच वाढू शकते.

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला येणाऱ्या दोन – तीन दिवसातच फायनल होईल, तेव्हाच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात