मुंबई- उ. महाराष्ट्रातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे भाजपात घरवापसी करणार हे स्पष्ट झालेलं आहे. खडसे यांनीच दिल्लीत जे पी नड्डा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ही माहिती दिली आहे. येत्या १० ते १५ दिवसांत दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असंही खडसेंनी सांगंितलंय. मात्र राज्य पातळीवर देवेंद्र फडणवीस किंवा गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली की नाही, याबाबत खडसेंनी मौन बाळगल्याचं दिसलं. तर दुसरीकडं गिरीश महाजन हेही याबाबत खडसे हे वरिष्ठ नेते असल्याचं सांगत प्रतिक्रिया देण्यापासून लांब राहत असल्याचं दिसलंय. तर तुटक तुटक प्रवेश नकोत, असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.
खडसे पक्षात आले तरी राज्याबाहेर राहणार
एकनाथ खडसे यांची घरवापसी झाली तरी त्यांना राज्यात भाजपात सक्रिय राजकारणात फारसा वाव नसेल, असं सांगण्यात येतंय. त्यात खडसे यांना राज्यपाल करण्यात येईल, अशीही चर्चा सुरु आहे. नेमक्या याच चर्चेवरुन अंजली दमानिया यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिलंय.
खडसेंना राज्यपाल करु नका-दमानिया
राष्ट्रपतींना लिहिलेल्या सहा पानी पत्रात अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांना राज्यपाल करु नये, अशी मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांच्याविरोधात असलेल्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची माहितीच या पत्रातून देण्यात आलेली आहे. नैतिक पतनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला राज्यपाल करु नये, अशी मागणी या पत्रातून करण्यात आलेली आहे.
या पत्राची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पाठवण्यात आलेली आहे. खडसेंच्या पक्ष प्रवेशापूर्वीच राष्ट्रपतींना लिहिण्यात आलेल्या या पत्रानं ंराजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. एकनाथ खडसे सत्तेत असताना अंजली दमानिया यांनी खडसे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत त्यावरुन जाब विचारला होता.