मुंबई- मविआ सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांच्या अटकेचं षडयंत्र रचलं जात होतं, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका मुलाखतीत केला आहे. लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दाव्यानं नवं राजकारण रंगलेलं आहे. खोट्या गुन्हात या चारही नेत्यांना अडकवण्याचा कट होता, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय.२०२४ च्या निवडमुकांआधी भाजपाचे काही आमदारही फोडण्याचा मविआचा प्लॅन होता, असाही गौप्यस्फोट एकनाथ शिंदेंनी केलाय. एकनाथ शिंदे हे त्यावेळी मविआ सरकारमध्ये मंत्रीपदी कार्यरत होते. मविआ सरकारच्या काळात डावलण्यात आल्याचा आरोपही शिंदेंनी केला होता. आता त्यांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
फडणवीस आणि भाजपाचे नेते अनटचेबल आहेत का- राऊत
बेकादेशीर फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचं नाव होतं. या प्रकरणात त्यांना अटकेची भीती वाटत होती, त्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेंवर दबाव निर्माण करुन आमदार फोडल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. २०१४ साली मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते. त्यात सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि आणखी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली होती, असा दावाही राऊतांनी केलाय. मुंबई बँक घोटाळा प्रकरणात प्रवीम दरेकर, तसंच इतर प्रकरणात प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांच्यावरही गुन्हे आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होणार होती. हे पंचक कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे का असा सवालही त्यांनी केलाय. या देशात पंतप्रधान, राज्यपालांवरही कारवाई झालेली आहे. विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना मोदी सरकारनं अटक केलीय. अनेक मंत्री, आमदार, खासदार यांना महाराष्ट्रात आणि देशभरात अटक झाली आहे, असंही राऊत म्हणालेत.
एकनाथ शिंदेंनाच अटक होणार होती-संजय राऊत
एकनाथ शिंदे यांनाच अटक होणार होती, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांना त्यावेळी अटकेची भीती दाखवण्यात आली होती. मोदी सरकार त्यांना अटक करणार होती की नव्हती, हे शिंदेंनी सांगावं, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलंय. एकनाथ शिंदे यांच्यावर अटकेचा दबाव होता म्हणून ते 40 आमदार घेऊन ते फुटले. ते फुटले नसते तर त्यांना अठक होणार होती, असा आरोपही राऊतांनी केलाय. स्वतःचा बचाव करण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं. सरकार पडलं नसतं तर या सगळ्यांना अटक झाली असती असे संकेतही त्यांनी दिलेत.
हेही वाचाःसाताऱ्याच्या बदल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यसभेची जागा, काय निघालाय तोडगा?