मुंबई – भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नाही, यावरुन ठाकरे शिवसेनेनं मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलेलं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या कृपाशंर सिंह यांना तिकिट दिलं जातं, मात्र गडकरींसारख्या निष्ठावान आणि कर्तृत्वान मंत्र्याचं नाव यादीत का नाही, असा प्रश्न ठाकरेंची शिवसेना विचारते आहे.
गडकरींना डावलण्यात येतंय का?
सामना या मुखपत्रात लिहिलेल्या अग्रलेखात नितीन गडकरींचं काय होणार, असा प्रश्न विचारण्यात आलाय. देशात गेल्या १० वर्षांत जो विकास झालाय, त्यात सर्वाधिक योगदान नितीन गडकरींच्या रस्ते निर्माण खात्याचं आहे, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलंय. मोदी-शाहांपुढे हाजी-हाजी करत नसल्यानं गडकरींना डावलण्यात येत असल्याचं या आग्रलेखात म्हटलंय. या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना तिकिट मिळणार नाही, त्यांना डावलण्यात येईल, असं भाकितही वर्तवण्यात आलंय.
मोदी-शाहांना गडकरींची भीती?
२०२४ लोकसभा निवडणूक निकालानंतर दिल्लीत अस्थिर राजकीय चित्र निर्माण झालं तर सर्वपक्षीयांना मान्य असतील असे गडकरी दिल्लीत नकोत, हा हिशोब यामागे असल्याची टीकाही अग्रलेखात करण्यात आलेली आहे. गडकरींना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळू नये यासाठीही गलिच्छ राजकारण करण्यात आल्याचा आरोपही अग्रलेखात करण्यात आलाय. गडकरींचं आव्हान किंवा भीती मोदी-शाहा आणि त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींना वाटते, असंही नमूद करण्यात आलेलं आहे.
गडकरींच्या जागी फडणवीसांना संधी?
नितीन गडकरींना संधी नाकारली तर नागपुरातून देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे उमेदवार असतील, असं भाकितही वर्तवण्यात आलेलं आहे. २०१४ साली गडकरी, एकनाथ खडसे यांच्यापैकी एखादा मुख्यमंत्री झाला अ्सता, तर आत्ताचं गलिच्छ राजकारण पाहावं लागलं नसतं अशी टीकाही करण्यात आलीय. फडणवीसांचा खांदा वापरुन गडकरींवर हल्ले सुरु असल्याचा आरोपही करण्यात आलाय.
हेही वाचा: लोकसभेच्या तोंडावर 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज? कर्जहमीतून महायुतीचा नवा डाव?