मुंबई – हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी मविआ आणि महायुतीपासून दोन हात लांब राहायचं ठरवलेलं आहे. येणारी लोकसभा निवडणूक स्वबळावर आणि एकला चलो रे च्या भूमिकेतून लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडीकडून जागावाटपाच्या चर्चेचा कोणताही प्रस्वातक आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. हातकणंगले मतदारसंघातून लढणार हे स्पष्ट करतानाच, आपल्याविरोधात उमेदवार द्यायचा की नाही, हे मविआनं ठरवावं, असं सूचक वक्तव्यही शेट्टी यांनी केलेलं आहे. मविआनं आपल्याविरोधात उमेदवार दिला नाही, तर त्याचं स्वागतच करेन असंही शेट्टींनी स्पष्ट केलेलं आहे.
सहापेक्षा जास्त लोकसभा लढवणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सहापेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. अनेक ठिकाणी काही नेते आणि कार्यकर्ते संपर्कात आहेत, ज्यांची इच्छा आहे, त्यांना तिकिट देण्यात येईल असंही शेट्टी म्हणाले आहेत.
कोणत्या सहा जागांवरुन शेट्टींची स्वाभिमानी रिंगणात
- हातकणंगले
- कोल्हापूर
- सांगली
- बुलडाणा
- परभणी
- माढा
या सहा लोकसभा मतदारसंघात तयारी सुरु केली असल्याचंही शेट्टींनी स्पष्ट केलेलं आहे.
मतदारांवर विश्वास- शेट्टी
विरोधकांनी हातकणंगले मतदारसंघात आठ हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा केला आहे. मात्र त्यापैकी किती कामे झाली हे जनता बघून घेईल, मी आता कुणावरही टीका करणार नाही. कारण पाच वर्षे किती काम झालं हे मतदारांनी पाहिलं आहे, मी निवडणूक लढणार आणि जिंकणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध
नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग होऊ घातला आहे. मात्र याला कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून सुपीक जमिनी जात असल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. एक महामार्ग असताना शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन नवीन महामार्ग का? शेतकऱ्यांचे थडगे बांधून कुणाचे मनोरे यांना उभा करायचे आहेत, असा खडा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला विचारला आहे.
हेही वाचा – ‘नागपुरातून फडणवीस रिंगणात, फडणवीसांचा खांदा वापरुन गडकरींवर हल्ले सुरु’, या नेत्यानं वर्तवलं मोठं भाकित ?