बिहार
भारत सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्पुरी ठाकूर यांच्या कामाचा दबदबा मोठा होता. त्याचं राहणीमान, कामाची पद्धत नेहमीच चर्चेचा विषय राहिला. अशा असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरव केला जात आहे, हे देशासाठी आनंदाची बाब आहे.
कर्पुरी ठाकूरांचा राजकीय प्रवास
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर हे स्वातंत्र्यानंतर राजकारणात सक्रिय राहिले. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी बिहारच्या समाजावर ज्या प्रकारची छाप सोडली, त्याचं दुसरं उदाहरण अद्यापही सापडत नाही. विशेष म्हणजे ते बिहारचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. 1952 ते 1984 पर्यंत सतत आमदार किंवा खासदार होते. आणीबाणीनंतर 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते समस्तीपूरमधून खासदारही निवडून आले. 1967 मध्ये ते बिहार सरकारच्या मंत्रालयामध्ये मंत्रीही होते.
1967 मध्ये ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी शिक्षणातील इंग्रजीची अट रद्द केली. त्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली पण त्यांनी शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत नेलं.
त्यांनी 1970 आणि 1977 मध्ये दोनदा बिहारचे मुख्यमंत्रीपदही भूषवले होते. 1971 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत ना-नफा जमिनीवरील महसूल कर बंद केला. बिहारच्या तत्कालीन मुख्यमंत्री सचिवालयाच्या इमारतीतील लिफ्ट चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध नव्हती, मुख्यमंत्री होताच त्यांनी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना लिफ्टचा वापर करता येईल याची खात्री करून घेतली. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील सर्व खात्यांमध्ये हिंदीतून काम करणे बंधनकारक केले होते. एवढेच नव्हे तर राज्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना समान वेतन आयोग लागू करणारे ते पहिले होते.
राहणीमानातील साधेपणा
सत्ता, पैसा असूनही त्यांचं राहणीमान सर्वसामान्यांसारखं होतं. मुख्यमंत्री निवासस्थानातही ते जमिनीवर झोपायचे. कर्पूरी ठाकूर यांच्या साधेपणाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांचे सचिव असलेले पत्रकार सुरेंद्र किशोर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सीएम पद सोडल्यानंतर त्यांनी कुटुंबाला मूळ गावी पिटौझिया येथे पाठवलं होतं. कारण त्यांचं उत्पन्न कमी होतं, मोठ्या शहरात ते कुटुंबाचा खर्च भागवू शकत नव्हते. मुलगा मंत्री आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांचे वडील गोकुळ ठाकूर न्हावी म्हणून काम करत होते. अनुरंजन झा यांनी त्यांच्या ‘गांधी मैदान ब्लफ ऑफ सोशल जस्टिस’ या पुस्तकात लिहिले आहे की कर्पूरी ठाकूर यांनी आमदारांसाठी देण्यात येणारा स्वस्त भूखंड घेण्यास नकार दिला होता.
मागासवर्गीयांसाठी लढले…
जातीने न्हावी असलेले कर्पुरी हे अत्यंत साधे राजकारणी मानले जायचे. कर्पूरी ठाकूर हे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जातीतील होते, पण त्यांनी जनसेवेच्या भावनेने राजकारण केले. मुख्यमंत्री असताना त्यांनी मागासवर्गीयांना 27 टक्के आरक्षण मिळवून दिले.
17 फेब्रुवारी 1988 रोजी तब्येत बिघडल्यामुळे कर्पूरी ठाकूर यांचे अचानक निधन झाले. राजकारणातील एवढ्या प्रदीर्घ प्रवासानंतर त्यांचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या कुटुंबाला देण्यासाठी त्यांच्या नावावर घरही नव्हतं. आज कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांमध्ये नेत्यांची नावं रोज समोर येत असताना, अशा राजकारणात कर्पूरी ठाकूर यांच्यासारखे नेते राजकारण आल्यानंतर केवळ जनतेची सेवा करत राहिले.