नागपूर – वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. रामदास तडस यांची सून पूजा तडस याही निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या पूजा तडस यांनी आज सुषमा अंधारेंसोबत पत्रकार परिषद घेतली. घरात पूजा तडस आणि त्यांच्या बाळाचा छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्याय द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केलीय. तसचं महिलांबाबत चंद्रपूरच्या सभेत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारीही रद्द करण्याची मागणी केली आहे.
पूजा तडस यांचे काय आरोप
रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी आपल्यावर बलवात्कार करुन गर्भवती ठेवल्याचा आरोप पूजा तडस यांनी केलाय. बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माध्यमांसमोर लग्न करण्यात आले, त्यानंतर आपल्याला एका फ्लॅटवर नेऊन ठेवण्यात आलं. हा मुलगा पंकजचा नाही असं सांगत खासदारांनी डीएनए टेस्ट करण्याची मागणी केल्याचंही तडस म्हणाल्या आहेत. प्रत्येकवेळी अत्याचार झाला असल्याचं सांगत १७ महिन्यांच्या बाळाला उपाशी ठेवण्याची वेळ आल्याचं पूजा तडस यांनी सांगितलंय. खासदार तडस म्हणतात की मुलाला बेदखल केलं तर मग ते मुलाला का घरी ठेवतात, असंही पूजा तडस म्हणाल्या आहेत. 20 तारखेला पंतप्रधान मोदी वर्धेत येणार, यावेळी मोदींनी न्याय द्यावा अशी विनंती पूजा तडस यांनी केली आहे. मुलगा पंकज यांचाच आहे यासाठी डीएनए टेस्ट करण्यासही तयार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
मुलाशी संबंध नाही,हे षडयंत्र- रामदास तडस
मुलाशी आपला कोणताही संबंध नाही, असं स्पष्टीकरण तडस यांनी दिलंय. या प्रकरणात पंकज तडस याला मारण्याचा प्रय़त्न केल्याचा आरोपही तडस यांनी केलाय. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं सांगत यावर फारसं भाष्य करणार नसल्याचं म्हटलय. हे षडयंत्र असून निवडणुकांच्या तोंडावर असे आरोप करण्यात येत असल्याची टीका तडस यांनी केलीय.
हेही वाचाःकाँग्रेसमधील बंडोबा 24 तासांत झाले थंडोबा, सांगली आणि मुंबईतील नाराज नेत्यांचे सूर नरमले