मुंबई- मविआच्या जागावाटपावर नाराज झालेल्या सांगली आणि मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांनी नाराजीची आणि बंडाची भाषा सुरु केली होती. मात्र दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांनी या नेत्यांचे कान पिळल्यानंतर नेत्यांच्या तोंडची बंडाची भाषा बदलल्याचं दिसतंय.
सांगलीत काय घडलं
सांगलीत चंद्रहार पाटील हेच मविआचे उमेदवार असतील हे जाहीर झाल्यानंतर, तिकिटासाठी आग्रही असलेले आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे तब्बल ३० तास नॉटरिचेबल झाले होते. दरम्यानच्या काळात विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी अकोल्यात जाऊन वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. वंचितकडून प्रतिक पाटील किंवा विशाल पाटील रिंगणात उतरतील अशी चर्चा सुरु झाली होती. काँग्रेसला जागा न मिळाल्यानं काँग्रेसच्या २५-३० पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले होते. मात्र दिल्लीतून सूत्र हलल्यानंतर विश्वजीत कदम यांनी बुधवारी संध्या काळी पत्रकार परिषद घेत, पुनर्विचाराची मागणी केलीय. थेट बंडाची भाषा न करता उमेदवारीचा पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करण्याची मागणी केलीय. त्यामुळं आता सांगलीत उमेदवार बदलाची शक्यता मावळल्याचं सांगण्यात येतंय.
वर्षा गायकवाडांचाही यू टर्न
दक्षिण मध्य मुंबईसाठी आग्रही असलेल्या वर्षा गायकवाड यांनीही नाराजी व्यक्त केली होती. नाना पटोले यांच्यावर आडमुठेपणाचा आरोप करत केसी वेणूगोपाल यांच्याशी संपर्क साधला होता. एका पत्रकार परिषदेचंही आयोजन करण्यात आलं होतं. मात्र दिल्लीतून निरोप आल्यानंतर पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. आता वर्षा गायकवाड यांनी नरमाईची भूमिका घेत, घडायचं ते घडलं असं सांगत पुढं गेल्याचं सांगितलंय. त्यामुळं दक्षिण मध्य मुंबईतही काही बंड वगैरे घडेल असं दिसत नाहीये.