मुंबई- अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं संताप व्यक्त केलाय. काँग्रेसचा उमेगवार हा संघ विचारांचा असल्याचा प्रचार सध्या अकोल्यात करण्यात येतोय. चार वेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रेंना भाजपानं तिकिट दिलंय. तर वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून रिंगणात आहेत. संघ विचारांचा उमेदवार देणारे नाना पटोले हे भाजपाचे स्लीपर सेल म्हणून कार्यरत असल्याचा आरोप करण्यात येतोय.
नाना पटोले भाजपाचे स्लीपर सेल?
मविआच्या जागावाटपाची स्थिती पाहीली आणि काँग्रेसची यादी पाहिली तर अनेक ठिकाणी काही जागा काँग्रेसनं उद्धव सेना आणि राष्ट्रवादीला दिल्याचं सांगण्यात येतंय. सांगली, दक्षिण मध्य आणि भिवंडीच्या जागांवर तडजोड करायला नको होती, असा सूर काँग्रेसमधूनच व्यक्त होतोय. यातून पक्षात प्रचंड नाराजी आहे. वर्षा गायकवाड यांनी नाना पटोलेंनी आडमुळी भूमिका घेतल्याचा आरोप करत थेट दिल्लीत पटोलेंविरोधात तक्रार केलेली आहे.
कमकुवत उमेदवार दिल्याचा आरोप
अनेक ठिकाणी नाना पटोले यांनी काँग्रेसकडून योग्य उमेदवाराला संधी दिली नाही, असा आरोप करण्यात येतोय.
१. धुळ्यातून शोभा बच्छाव यांना देण्यात आलेल्या उमेदवारीला मालेगावातून आणि धुळ्यातून विरोध होताना दिसतोय. धुळ्यातून चंद्रकांत रघुवंशी किंवा कुणाल पाटील यांना संधी दिली असती तर ते विजयी झाले असते, असं नेते खासगीत सांगतायेत.
२. भंडारा गोंदिया मतदारसंघात नाना पटोले उभे राहिले असते तर ते विजयी झाले असते असा सर्वे होता. मात्र त्या ठिकाणाहून उभं राहण्याचं नाना पटोले यांनी नाकारल्याचं सांगण्यात येतंय.
३. दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या. त्यांना तिकिट दिलं असतं तर विजय सोपा झाला असता, मात्र त्या ठिकाणीही काँग्रेसनं कच खाल्ल्याचा आरोप करण्यात येतोय.
४. उत्तर मध्य मुंबई पूनम महाजन यांच्या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराविरोधात नसीम खान यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. त्यांना तिकिट दिल्यास मतांचं ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा भाजपाला मिळेल असं दिसतंय. तरीही खान यांच्या नावासाठी आग्रह धरण्यात येतोय.
५. उत्तर मुंबईची काँग्रेसची हक्काची जागा सोडून ती ठाकरेंच्या शिवसेनेला आंदण देण्यात येतेय. मात्र प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले यात फारशी आग्रही भूमिका घेताना दिसत नाहीयेत.
६. रामटेक मतदारसंघात रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद होईल याची पूर्ण कल्पना असतानाही त्यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळं काँग्रेसला ऐनवेळी बर्वेंच्या पतीचा प्रचार करण्याची वेळ काँग्रेसवर येऊन ठेपलीय.
७. गडचिरोली मतदारसंघात नामदेव उसेंडींना काँग्रेसनं तिकिट दिलं असतं तर भाजपाच्या अशोक नेतेंचा विजय अवघड झाला असता, मात्र नामदेव किरसान यांना तिकीट देण्यात आलं.
पटोलेंचं भाजपासोबत सेटिंग?
विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातही भाजपाच्या उमेदवारांसमोर कमकुवत उमेदवार देण्याबाबत पटोले आग्रही का असा सवाल विचारण्यात येतोय. पडद्याआड भाजपाशी त्यांचे काही संबंध आहेत का, अशीही चर्चा सुरुये. कारवाई टाळण्यासाठी कमकुवत उमेदवार नाना पटोलेंकडून देण्यात येतायेत का, अशी विचारणा पक्षातील नेते आणि मविआतील नेतेमंडळी करतायेत. वंचितनं केलेल्या स्लीपर सेलच्या आरोपात किती तथ्य आहे, हे नाना पटोलेच सांगू शकतील.
हेही वाचाःसांगलीपाठोपाठ उत्तर मुंबईतही मविआत उमेदवारावरुन चुरस, घोसाळकर पंजावर लढणार की मशालीवर?