मुंबई – महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालं असलं तरी वाद संपण्याचं चिन्ह दिसत नाहीये. सांगलीत काँग्रेस नेते विश्नजीत कदम आणि विशाल पाटील यांची नाराजी कायम आहे. तर दुसरीकडे मुंबईतील काँग्रेसला सोडण्यात आलेल्या दोन जागांवर उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईतून अद्याप कुमआला उमेदवारी द्यायची याचा निर्णय झालेला नाही. उत्तर मुंबईत काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्याचं सांगण्यात येतंय. तर या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. घोसाळकर यांनाच तिकिट मिळावं अशी मागणी ठाकरेंचे शिवसैनिक करतायेत. काँग्रेसही अनुकूल आहे, मात्र चिन्ह कुणाचं यावर आता घोडं अडलंय.
काँग्रेसचा काय प्रस्ताव
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोसाळकर यांना काँग्रेसच्या पंजा चिन्वाह निवडणूक लढवण्याची ऑफर दिलेली आहे. विनोद घोसाळकर यांनीच ही माहिती माध्यमांना दिलीय. दुसरीकडं ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावरच लढण्यासाठी आग्रही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. याबाबत मंगळवारी घोसाळकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशीही चर्चा केलीय. आता याबाबत काय निर्णय होणार हे पाहावं लागणार आहे.
वर्षा गायकवाडांनाही गळ
ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आणि बुधवारी याबाबत वर्षा गायकवाड यांचीही भेट घेतली आहे. उत्तर मुंबईतून घोसाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांच्याकडंही करण्यात आलीय. येत्या एक दोन दिवसांत याबाबत काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. अशात दक्षिण मध्य पाठोपाठ उत्तर मुंबई जागाही काँग्रेसला सोडावी लागणार का, याची उत्सुकता आहे.
हेेही वाचाःनाशिकचा महायुतीचा तिढा कायम, भुजबळांना भाजपाच्या कमळावर लढवण्याचा आग्रह कशासाठी?