मुंबई
2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करुन महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला होता. 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) या कालावधीत 36,634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमातून दिली आहे.
आता 2023-24 च्या दुसर्या तिमाहीची (जुलै ते सप्टेंबर 2023) सुद्धा आकडेवारी आली असून, 28,868 कोटी रुपयांचा एफडीआय आकर्षित करुन पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत एकूण 65,502 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून, ती जवळजवळ कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीइतकी आहे. एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 असा एकत्रित विचार केल्यास 1,83,924 कोटी रुपयांचा एफडीआय महाराष्ट्रात आला आहे. यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे.
देवेंद्र फडणवीसांचं ट्विट :
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1740036295957885143/photo/1
मुंबईतील डायमंड मार्केट सुरजला गेल्यावरुन महाविकास आघाडीकडून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला जात आहे. महाराष्ट्रातील रोजगार दुसऱ्या राज्यात जात असल्यामुळे येथे रोजगाराचा मोठा प्रश्न उपस्थित झाल्याचंही विरोधकांचं म्हणणं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाराष्ट्रात सर्वाधित थेट परकीय गुंतवणूक वाढल्याचं म्हटलं आहे.