नवी दिल्ली : माजी राजकीय रणनीतीकार आणि जनसुराज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर हे अनेक पक्षांना आणि नेत्यांना विजयी करण्यासाठी ओळखले जातात. सध्या बिहारमध्ये राजकीय आकलन करणाऱ्या आणि संघटनेची बांधणी करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं भवितव्य काय असेल याचा अंदाज वर्तवला आहे.
काँग्रेसला किती जागा?
येत्या लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसला १०० चा आकडाही गाठता येणार नाही, असं मत प्रशांत किशोर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. राहुल गांधी यांच्या भारत जोडो आणि भारत न्याय यात्रेनंतरही काँग्रेसच्या कामगिरीत मोठा बदल किंवा परिणाम होईल, असं दिसत नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. निवडणुकांच्या निकालात काँग्रेसच्या आकडेवारीत फारसा सकारात्मक बदल होणार नाही, असंही पीके म्हणाले. देशाच्या राजकारणात उलटफेर व्हायचा असेल तर काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात. मात्र सध्याची देशातली राजकीय परिस्थिती पाहता हे शक्य नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
भाजपा ३७० चा आकडा गाठेल?
दुसरीकडे ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाच्या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. भाजपानं या निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचा संकल्प केलेला आहे. मात्र भाजपाला इतक्या जागा मिळणार नाहीत. मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपाची कामगिरी चांगली असेल. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
भाजपनं कार्यकर्त्यांसाठी ३७० जागांचं टार्गेट ठरवलेलं आहे. मात्र प्रत्यक्षात इतक्या जागा निवडणून येणं अवघड असल्याचं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे. हे प्रत्यक्षात घडलं तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. २०१४ नंतरच्या ८ ते ९ निवडणुकांत भाजपानं संकल्प केलेल्या जागा त्यांना मिळालेल्या नाहीत, असंही पीकेंनी सांगितलं आहे.
हे ही वाचा – मुरादाबादमध्ये राहुल-प्रियांका यांची एकत्र भारत जोडो न्याय यात्रा, स्वागतासाठी मोठी गर्दी