X: @therajkaran
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईतील शिवाजी पार्क (Mumbai Shivaji Park) येथे समारोप झाला. या सभेसाठी देशभरातील अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यात महाराष्ट्रातील नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सर्वच नेत्यांनी मोदींविरोधात नारा दिला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना सणसणीत टोला लगावला आहे.
देश त्यांचा परिवार आहे, असे मोदी म्हणतात. पण मोदींनी शेवटचे ४ दिवस तरी पत्नीला घरी राहायला आणावे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. मोदी म्हणतात संपूर्ण देश त्यांचा परिवार आहे. ही गोष्ट खरी आहे, पण त्यांच्या खऱ्या कुटुंबातील एक महिला त्यांच्यासोबत राहत नाही. हिंदू समाजात जे नातं असते, ते नातं मोदींनी निभवावं आणि आपल्या पत्नीला सांभाळावे. असा टोला त्यांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले, आपल्याला लढायचे आहे. एकत्र किंवा एकटे, पण लढावे लागणारच आहे. देशात इलेक्टोरल बाँड आला आहे. टीव्हीवरील प्रत्येक चॅनलवर अमित शाह इलेक्शनच्या माध्यमातून काळापैसा आम्ही घालवल्याचे बोलत आहेत. पण माझा मोदी आणि शहांना महत्त्वाचा प्रश्न आहे. फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिस कंपनीची नेट प्रॉफिट २१५ कोटी इतके आहे. त्यांनी इलेक्ट्रॉल बाँड १ हजार ३६० कोटींची खरेदी केली. कंपनीने २०० कोटी रुपये नफा कमावला असताना त्यांनी १ हजार ३०० कोटींचा बॉन्ड कसा खरेदी केला? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी देशभरातील नेते मु्ंबईत दाखल झाले होते. ज्यात आरजेडीचे तेजस्वी यादव, जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश होता.