आसाम
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी आसाममध्ये आहेत. यावेळी येथील एका मंदिरात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आसाममधील नागांव जिल्ह्यात पोहोचली आहे. येथे बताद्रवा थान भागात वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांचं जन्मस्थळ आहे. राहुल गांधींना आज शंकरदेव मंदिरात जायचं होतं. मात्र त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं, याशिवाय भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. याचा विरोध करीत काँग्रेस महिला कार्यकर्ता मंदिरासमोर धरणे आंदोलन करीत आहे.
मंदिरात जाण्यापासून रोखण्याबद्दल राहुल गांधी म्हणाले, मी काय गुन्हा केला आहे, की मला मंदिरात जाण्यापासून रोखलं जात आहे. मंदिरात कोणी जायचं हे आता पंतप्रधान मोदीच ठरवणार आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्हाला मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. आज केवळ एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते, असंही ते यावेळी म्हणाले.
जयराम रमेशनीं लावला आरोप
काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी सरकारवर आरोप केले आहेत. यापूर्वी आम्ही मंदिराच्या दर्शनासाठी येणार असल्याचं सांगितलं होतं. आम्ही तुमचं स्वागत करू असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आज अचानक ३ वाजेपूर्वी मंदिरात येता येणार नसल्याचं सांगितलं जात आहे. राज्य सरकारा दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आम्ही मंदिराता जाण्याचा प्रयत्न करू.