तळ कोकणात शिवसेना विरोधात शिवसेना असा जंगी सामना होणार!
X: @milindmane70
मुंबई: येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तळ कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोकणचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण तातू राणे यांच्या ऐवजी शिंदे गटाचे नेते व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तळ कोकणात शिवसेना विरोधात शिवसेना असा जंगी सामना रंगणार आहे.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांच्या नावाची घोषणा यापूर्वी झाली आहे. नारायण राणे यांना राज्यसभेची दुसऱ्यांदा उमेदवारी देण्याऐवजी याच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आले होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे राणे निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा वेळी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या रूपात भाजपकडे खासदार विनायक राऊत यांच्याशी लढत देणारा उमेदवार असतानाही या जागेवर शिंदे गटाकडून उमेदवार देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या जागेवर किरण उर्फ भैय्यासाहेब सामंत यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
नारायण राणे हे 1990 पासून कोकणात राजकारणात सक्रिय आहेत. कोकणातील मोठा संपर्क व कोकणातील अनेक नेत्यांशी त्यांचे असलेले वैयक्तिक संबंध त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उपयोगी आले असते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे ते विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत. किरण सामंत यांनी यापूर्वी या मतदारसंघावर दावा केला होता. सामंत कुटुंब मूळचे वेंगुर्ले तालुक्यातील असले तरी त्यांची कर्मभूमी रत्नागिरी राहिलेली आहे. त्यामुळे या लढतीत किरण सामंत यांना किती फायदा होईल, याबाबत आतापासूनच तर्कवितर्क लढविले जात आहेत.
नारायण राणे यांच्यापेक्षा किरण सामंत यांचा मतदारसंघातील संपर्क अत्यल्प असल्याचे या मतदारसंघातील अनेक राजकीय निरीक्षकांकडून सांगण्यात येते. या मतदारसंघात मराठा, कुणबी, वाणी, भंडारी या समाजाचे प्राबल्य आहे. या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, राजापूर व रत्नागिरी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी अशा मतदारसंघांचा समावेश होतो. या लोकसभा मतदारसंघात कोकणातील प्रस्तावित नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला नारायण राणे यांचे असलेले समर्थन व विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा असलेला विरोध हा या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा होऊ शकेल.
विनायक राऊत यांचा 2014 व 2019 या सलग दहा वर्षात या मतदारसंघावर असलेला पगडा आणि शिवसेनेचा कट्टर मतदार ही विनायक राऊत यांची जमेची बाजू आहे. शिवसेना फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती ही विनायक राऊत यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ सन 2008 मध्ये अस्तित्वात आला. सन 2009 मध्ये निलेश नारायण राणे हे काँग्रेस पक्षाकडून खासदार म्हणून निवडून गेले. 2014 आणि 2019 च्या सलग दोन निवडणुकीत विनायक राऊत हे शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघातील 2009 ते 2019 या तीन लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे;
सन 2009 ची लोकसभा निवडणूक
निलेश नारायण राणे (काँग्रेस पक्ष) – 3,53,915, (49.24%)
सुरेश प्रभू (शिवसेना) – 3,07,165, (42.74%)
सुरेंद्र बोरकर (अपक्ष) – 18,858,(2.62%)
अजय जाधव (क्रांतिकारी जय हिंद सेना) – 7,405, (1.03%)
जयेंद्र परुळेकर (बसपा) – 15.469, (2.15%)
शिराज कौचाली (भारिप) – 6,587, (0.92%)
अकबर कल्पे (अपक्ष) – 4,516, (0.63%)
विलासराव खानविलकर (अखिल भारतीय हिंदू महासभा) – 2,448 (0.34%)
राजेश सुर्वे (राष्ट्रीय समाज पक्ष) – 2,358, (0.33%)
या मतदारसंघात सात लाख 18 हजार 721 मतदान झाले. त्यापैकी 46,750 मताधिक्याने निलेश राणे यांचा विजय झाला होता.
सन 2014 ची लोकसभा निवडणूक
निलेश नारायण राणे (काँग्रेस पक्ष) – 3,43,037, (38.27%)
विनायक भाऊराव राऊत (शिवसेना) – 4,93,088, (55.02%)
राजेंद्र लहू आयरे (बहुजन समाज पार्टी) – 13,088, (1.46)
अभिजीत श्रीरामहेग शेट्य. (आप) – 12,700, (1.42%)
सुनील उर्फ यशवंत वसंत पेडणेकर (अपक्ष) – 7,328, (0.82%)
अरुण हरिश्चंद्र मांजरेकर (अपक्ष) – 5,999, (0.67%)
दीपक दत्ताराम नेवगी (समाजवादी पक्ष) – 2,904, (0.32%)
अजिंक्य धोंडू गावडे (अपक्ष) – 2,332, (0.26%)
अनंत यशवंत बिरजे (भारत मुक्ती मोर्चा) – 1,992, (0.22%)
विनोद सावंत (अखिल भारतीय हिंदू महासभा) – 1,395, (0.16%)
या लोकसभा निवडणुकीत नोटाला पडलेली मतं 12,393 (1.38%) तर 13 लाख 67 हजार 362 मतदार होते, त्यापैकी 8 लाख 96 हजार 49 मतदान झाले. या मतदानाची टक्केवारी (65.66%) होती. एक लाख 50 हजार 51 च्या फरकाने विनायक राऊत हे विजयी झाले होते.
सन 2019 ची लोकसभा निवडणूक
विनायक भाऊराव राऊत (शिवसेना) – 4,58,022, (50.83%)
निलेश नारायण राणे (स्वाभिमानी पक्ष) – 2,79,700, (31.04%)
नवीन चंद्र बावडेकर (काँग्रेस आय) – 63,299, (7.02%)
मारुती रामचंद्र जोशी (अपक्ष) – 30,882, (3.43%)
या निवडणुकीत नोटाला 13,777 मत पडली (19.79%)
या निवडणुकीत एकूण झालेले मतदान 9,02,355 (61.99%)
शिवसेनेचे विनायक भाऊराव राऊत हे 1,78,322 मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत २००९ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभे राहिलेले निलेश नारायण राणे हे 2019 च्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर उभे राहिल्याने काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी झाली व त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी रत्नागिरी, राजापूर, कुडाळ व सावंतवाडी या तीन मतदारसंघावर शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. तर चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादीचे शेखर निकम आमदार म्हणून निवडून आले होते. कणकवली मतदारसंघात नितेश राणे हे एकमेव आमदार भाजपाकडून निवडून आले होते.
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उदय सामंत व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले दीपक केसरकर हे दोन आमदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे गटाकडे राजापूर विधानसभा मतदारसंघातील राजन साळवी व कुडाळ, वैभववाडी मतदारसंघातून निवडून आलेले वैभव नाईक हे दोनच आमदार आहेत.
कोकणातील राजकीय समीकरणे बघितली तर सत्तेच्या विरोधातील खासदार निवडण्याची परंपरा कोकणात कायम आहे. किरण सामंत यांना उमेदवारी दिल्यास नारायण राणे यांच्यासह नीलेश आणि नितेश हे त्यांचे सुपुत्र सामंत यांचे काम करतील का याबाबत आतापासूनच वेगवेगळ्या चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. सामंत घराण्यावर गद्दारीचा डाग आहे. वारंवार स्वतःच्या सोयीसाठी पक्ष बदलणाऱ्या सामंतांना जनता स्वीकारेल का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. त्या उलट कायम पक्षनिष्ठ असणारे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचे पारडे सध्या तरी जड असल्याची चर्चा आहे. एकंदरीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, अशी होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
Also Read: कृषिफिडर सौरऊर्जेवर आणण्याचा निर्णय क्रांतिकारी! – चंद्रशेखर बावनकुळे