भोपाळ
मध्य प्रदेशातून सध्या मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यांचा खासदार मुलगा नकुलनाथ आणि काही आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर कमलनाथ यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी, माजी मंत्री सज्जर सिंह वर्मा आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी यापूर्वीच कमलनाथांच्या भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळली आहे. मध्य प्रदेशचे माजी मंत्री सज्जन वर्मा यांनी रविवारी १८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेतली होती.
ही भेट कमलनाथ यांच्या निवासस्थानी तब्बल तीन मिनिट चालली. भेटीनंतर सज्जन सिंह वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, काही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचंही त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. मी गेल्या ४० वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे. जिथं कमलनाथ असतील मी तिथेच असेल. वर्मा पुढे म्हणाले, कमलनाथ काँग्रेसमध्ये आहेत आणि उद्याही काँग्रेसमध्येच असतील. मात्र परवाचं सांगता येत नाही.
कमलनाथांचं लक्ष लोकसभेच्या 29 जागांवर : वर्मा
कमलनाथ यांचं लक्ष लोकसभेच्या 29 जागांवर असल्याचं सज्जन सिंग वर्मा यांनी सांगितलं. ते जातीय समीकरणं तयार करीत आहेत. तिकीट कोणाला द्यायचे याकडे लक्ष लागले आहे. कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं वृत्त फेटाळलं आहे.