मुंबई : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल( Arvind Kejriwal )यांना सध्या तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे .केजरीवाल यांनी त्यांचा आयफोन (iPhone )स्विच ऑफ केला असून त्याचा पासवर्ड पण ते कोणाला सांगत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईडीने (Enforcement Directorate )तातडीने फोन निर्मिती करणारी कंपनी ॲप्पलकडे धाव घेऊन त्यांच्याकडे मदत मागितली आहे . या आयफोनमधून घोटाळ्याशी संबधीत माहिती मिळेल असा ईडीचा अंदाज आहे . त्यामुळे ईडीचे पथक ॲप्पल कार्यालयात ठाण मांडून बसल्याची चर्चा आहे.
केजरीवाल यांच्यावर ईडीकडून प्रश्नांचा भडीमार केला जात आहे . चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना उत्तर जाणून घेण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागत आहे .याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या आयफोन संदर्भात ॲप्पलशी संपर्क केला. त्यांनी आयफोन उघडण्यासाठी कंपनीकडे सहकार्य मागितले. तेव्हा कंपनीने मोबाईलमधील माहिती मिळविण्यासाठी पासवर्ड आवश्यक असल्याचे सांगितले. ईडीकडे केजरीवाल यांचे चार स्मार्टफोन आहेत. हे मोबाईल त्यांनी कारवाईदरम्यान जप्त केले आहेत. त्यामुळे ईडीला आता आयफोनचं लॉक निघणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे . केजरीवाल यांच्या अगोदर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंद्र जैन आणि राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीत मद्य धोरण ठरविताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्थात आपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान चौकशीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ईडीला सांगितले आहे की , हा फोन जवळपास एक वर्ष त्यांच्याकडे आहे आणि 2020-2021 च्या मद्य धोरणाचा मसुदा तयार करताना ते जे उपकरण वापरत होते ते आता त्यांच्याकडे नाही. दररोज सुमारे पाच तास मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. केजरीवाल यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे