मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले मतदारसंघ (Hatkanangle Lok Sabha) जागावाटपावरून चांगलाच चर्चेत आला आहे . एकनाथ शिदेंच्या शिवसेनेने हातकणंगल्यातून धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.त्यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti)रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे .मात्र राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता वेगळा पावित्रा घेतल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीने या मतदारसंघात अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, आज यावरून धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले , माझी उमेदवारी जाहीर झाली आहे आता यात कोणताही बदल आता होणार नाही . ‘चर्चा’ या ‘चर्चा’ असतात त्यामध्ये काही अर्थ नसतो . शेट्टीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे मतदार संघातील प्रत्येक मतदाराने पाहिले असल्याचे म्हणत त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे .
एकदा ‘एकला चलो रे’ म्हणतात तर एकदा पुढे जातात. तर एकदा तुमचं चिन्ह घ्यायला तयार आहे असेही म्हणतात. तर एकदा मी माझ्या ताकदीवर पुढे जात आहे असे वेगवेगळे स्टेटमेंट ते करत आहेत. दुसऱ्या बाजूला आमचं व्हिजन क्लिअर आहे. कोणाला वाईट म्हणून आम्ही मतं मागत नाही. स्वतःकडे स्वाभिमान असेल तर दुसऱ्याच्या पाठिंबासाठी ते पायऱ्या का झिजवत आहेत? असा सवाल माने यांनी राजू शेट्टी यांच्याबद्दल केला आहे. तसेच या मतदारसंघात मी कसा निवडून येईल हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. शेट्टी हे स्वतः पूरतं राजकारण करतात. नाव स्वाभिमानी ठेवून स्वाभिमान जागृत करता येत नाही त्यासाठी स्वाभिमानाने राहाव लागत आहे. ते एका भूमिकेशी कधीही ठाम राहिले नाहीत . एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई-वडील नको अशी परिस्थिती आहे. एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण त्याच्या सोबत असलेल्या दोन्ही पक्षांचा स्पर्श देखील नको. असा हल्लाबोल माने यांनी चढवला आहे .
तर दुसरीकडे हातकणंगल्यातून शिवसेनेने धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला भाजपचा प्रचंड विरोध आहे . हातकणंगल्याची जागा ही भाजपने लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यातच आता हातकणंगलेमधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील हे धैर्यशील माने यांच्यावर नाराज आहेत. जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत धैर्यशील मानेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे