विश्लेषण महाराष्ट्र

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक : भाजपने तयार केली ७५०० कार्यकर्त्यांची फौज

X : @milindmane70

महाड – केंद्रात भाजपा पुरस्कृत एनडीए सरकार (NDA government) आल्यानंतर व महाराष्ट्रात भाजपचा (Maharashtra BJP) दारुण पराभव झाल्यानंतर राज्य भाजपाने कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघावर (Konkan and Mumbai graduate constituencies) लक्ष केंद्रित केले आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून पुन्हा एकदा विजय संपादित करण्यासाठी भाजपाने पाच जिल्हे व 48 तालुक्यातून 7 हजार पाचशे कार्यकर्त्यांची फौज तयार केली आहे. 30 मतदारांमागे एक कार्यकर्ता अशी निवडणुकीची रणनीती (election strategy) भाजपाने आखली आहे.

भाजपाने मुंबई पदवीधर मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक या मतदारसंघासाठी तालुका व जिल्हा निहाय कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे, त्यांना उमेदवारांकडून कशी मते प्राप्त करायची याबाबत प्रशिक्षण दिले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाकडून निरंजन वसंत डावखरे (Niranjan Dawkhare) हे पुन्हा एकदा निवडणूक लढवीत आहेत. निरंजन डावखरे यांना पदवीधरांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे चित्र ठाणे जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात असणाऱ्या मतदारांवर विजयश्री खेचून आणण्यासाठी निरंजन डावखरे यांच्या सह भाजपाने आतापासून कंबर कसली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघात पालघर ,ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांमधून 48 तालुक्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदारांचा समावेश होतो.
पाच जिल्ह्यांची मतदार संख्या पुढील प्रमाणे :
ठाणे जिल्ह्यामध्ये 42 हजार 478 स्त्री व 56 हजार 371 पुरुष मतदार आहेत तर तृतीयपंथी (transgender voters) 11 आहेत.
रायगड जिल्ह्यात 23 हजार 356 स्त्री व 32843 पुरुष मतदार तर तृतीयपंथी नऊ आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात 9228 स्त्री व 13453 पुरुष मतदार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7498 स्त्री व 11053 पुरुष मतदार आहेत.
पालघर जिल्ह्यात 12 हजार 987 स्त्री व 15930 पुरुष व आठ तृतीयपंथी मतदार आहेत

यापैकी सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात आत्तापर्यंत 2 लाख 23 हजार 225 पदवीधरांनी नोंदणी केली आहे. कोकण पदवीधर मतदार संघात पाच जिल्ह्यांचा समावेश असला तरी रायगड (Raigad) व ठाणे (Thane) या दोन जिल्ह्यामधूनच ज्या उमेदवाराला मते मिळतील, तो विजयाकडे वाटचाल करेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

त्यातच ठाणे जिल्ह्यात निरंजन डावखरे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान नोंदणी केल्याचे दावे केले जात आहे. मात्र मागील दोन निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर देखील त्यांनी पदवीधर मतदारांच्या प्रश्नांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांना पदवीधर मतदारसंघातूनच मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे चित्र ठाणे जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. अशात शिवसेनेत दोन गट (split in Shiv Sena) पडल्यामुळे निरंजन डावखरे यांना पूर्वीसारखे मताधिक्य ठाणे जिल्ह्यातून प्राप्त करता येणे शक्य नसल्याचे पदवीधरांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.

रायगड जिल्ह्यातून कोकण पदवीधर मतदार संघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) माघार घेतली असून ही जागा काँग्रेस (Congress) पक्षाला सोडली आहे. या मतदारसंघातून रमेश कीर (Ramesh Keer) हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत आहेत.

रायगडातील भूमिपुत्र असलेले किशोर जैन यांनी देखील पदवीधर मतदार नोंदणीमध्ये रायगड जिल्ह्यात मोठी नोंदणी करून हक्काचा मतदार राखून ठेवला आहे. पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे किशोर जैन (Kishor Jain) यांनी माघार घेतली असली तरी शिवसेनेचा मतदार काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करेल, त्यामुळे पदवीधर मतदार संघाची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसऱ्या पसंतीच्या मतांवर विजयाचा गुलाल लागणार

कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयासाठी आवश्यक असणारी पहिल्या पसंतीची मते (first preferential votes) कोणत्याही उमेदवाराला मिळणार नसल्याने दुसऱ्या पसंतीची मते (second preferential votes) ज्या उमेदवाराला मिळतील तोच उमेदवार निवडून येईल. कारण मागच्या दहा वर्षात कोकण पदवीधर मतदार संघातील पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यास विद्यमान आमदारांनी लक्ष दिले नसल्याने पदवीधर मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचे पदवीधरांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे. या मतदार संघात ज्या उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची मते मिळतील तोच उमेदवार विजयाचा गुलाल लावेल.

घोडेबाजार अटळ?

लोकसभा निवडणुकीप्रमाणे कोकण पदवीधर मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार (horse trading in election) होण्याची शक्यता पदवीधरांच्या तोंडून ऐकण्यास मिळते. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणाला मतदारसंघातील मते मिळवण्यासाठी घोडेबाजार झाला, तशाच पद्धतीने शेवटच्या दिवशी पदवीधर मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोडेबाजार होणार असल्याची चर्चा आहे. यावेळी गेल्या निवडणुकीपेक्षा अडीच पटीने विटामीन एम चा डोस दिला जाईल, अशा कोडवर्ड मध्ये चर्चा सुरू आहे.

7500 कार्यकर्ते तैनात?

कोकण पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यातील 48 तालुक्यात सद्यस्थितीत 2 लाख 23 हजार 225 मतदार आहेत. या मतदारांपैकी सर्वाधिक मते मिळवण्यासाठी भाजपाने तीस मतदारांमागे एक कार्यकर्ता कार्यरत केला आहे. निरंजन डावखरे यांच्या विजयासाठी भाजपाने रणनीती म्हणून साधारणत: 7500 कार्यकर्त्यांची फौज उभी केल्याचे गोपनीयरित्या सांगण्यात येत आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच पदवीधर मतदारसंघाची रणधुमाळी कोकणात ऐन पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात रंगताना दिसून येत आहे. मात्र विजयाची घोडदौड ही पहिल्या पसंतीच्या मतांवर नाही तर दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून असणार आहे एवढे मात्र नक्की!

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात