X : @therajkaran
नागपूर
संपूर्ण हिवाळी अधिवेशनात विदर्भासाठी (Vidarbha) चर्चेचा एकही प्रस्ताव विरोधी पक्षांनी दिला नाही. अंतिम आठवडा प्रस्ताव हा विदर्भावरील चर्चेचा असायला हवा होता. इतिहासाचे दाखले तसेच आहेत. मात्र विरोधी पक्षाला विदर्भाचा विसर पडला, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत केला.
पोलीस विभागाचा नवा आकृतीबंध या सरकारने तयार केला असे त्यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत होते. विरोधी पक्षनेते विदर्भाचे आहेत तरी हे व्हावे याचे नवल वाटले. ड्रग्स संदर्भात चोवीस हजार आरोपींवर कारवाई झाली. पोलीस दलात २३ हजार पेक्षा जास्त अशी अभूतपूर्व भरती झाली (Recruitment in police force) आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एनसीआरबीचा अहवाल वाचायला शिका, असा टोला लगावताना महाराष्ट्र राज्याचा क्रमांक गुन्हेगारीत पहिला हा आरोप त्यांनी आकडेवारी देत खोडून काढला.
महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट (Cyber project) हा डायनामिक प्लॅटफॉर्म, सायबर गुन्हे रोखण्यासाठी निर्माण करण्यात येत आहे असेही त्यांनी जाहीर केले. आपण सरकारमध्ये आल्यापासून नागपूर (Nagpur) शहराचे नाव गुन्हेगारीत पुढे अशी टीका काही लोक करतात. मात्र अशा प्रचाराचा दुष्परिणाम गुंतवणूकीवर होऊ शकतात. वैनगंगा -नळगंगा प्रकल्पासंदर्भातील सर्व तरतुदी आपण मुख्यमंत्री असताना पूर्ण केल्या होत्या. परंतु नंतरच्या सरकार काळात तो कॅबिनेट बैठकीत आला नाही. आम्ही हा मंत्रिमंडळापुढे आणू असेही त्यांनी सांगितले.