मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीनंतर विधानपरिषदेच्या (Legislative Council Election 2024) ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे . महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाल 27 जुलै रोजी संपत असल्याकारणानं, या जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी मतदान होणार आहे तर त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने (Thackeray Group) निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)जाण्याची तयारी केली आहे . त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई सुरु असतानाच ठाकरेंच्या या मुद्द्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे .
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे. जर याचिका दाखल केली तर विधान परिषद निवडणूक कायदेशीर पेचात अडकू शकते. दरम्यान याअगोदर आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे नवा पेच निर्माण होऊ शकतो .
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचून जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना 2 जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 3 जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाईल. तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज 5 जुलैपर्यंत मागे घेता येईल. 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. 12 जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.