मुंबई : सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी राजकीय सभा, दौऱ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. १४ मार्चपर्यंत आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती आहे. अद्याप निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र एप्रिलपर्यंत लोकसभेच्या निवडणूका होणार असल्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांचा मावळ लोकसभा मतदारसंघत जनसंवाद दौरा आहे. मावळ मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत. तर अजित पवारांचाही या भागात कंट्रोल आहे. उद्धव ठाकरे आज दुपारी ३ वाजता तळोचा येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचं उद्घाटन करणार आहेत. यानंतर कर्जत विधानसभ, पनवेल विधानसभा, उरण विधानसभा येथे दौरा करतील. कर्जत विधानसभेतील खोपोलीतील सतिष झोकोटीया मैदानात उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.
दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या इलाख्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिमच्या दौऱ्यावर असून दुपारनंतर ते जळगावकडे प्रयाण करतील.
शरद पवारांनंतर आज अजित पवार शिरूरच्या दौऱ्यावर आहे. येथील मंचरमध्ये दादांची प्रत्युत्तर सभा होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघांचे खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी आव्हान दिल्यानंतर अमोल कोल्हेंनी जनसंवाद यात्रा काढत आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. त्यानंतर आज अजित पवार शिरूर दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेक पक्षप्रवेश होणार असल्याचीही माहिती आहे.
प्रकाश आंबेडकर आज नाना पटोले यांचा जिल्हा भंडारा येथे सभा घेणार आहेत. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं असून जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरवण्यात आल्याची माहिती आहे.
हे ही वाचा – शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा आज तुकडा पडणार? अजित पवारांच्या दौऱ्यात नेमकं काय?