शिरुर- महायुतीत शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन सुरु असलेल्या गोंधळावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात कोण लढणार, हे आजच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी मिळणार, याची स्पष्टता आज येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत राहणार की अजित पवार यांच्या पक्षात दिसणार, हेही आज स्पष्ट होईल.
शिवाजीराव आढळरावांचा आज पक्षप्रवेश?
लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यात शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा निर्णय अजित पवारांना लवकर करावा लागणार आहे. माजी खासदार आणि सध्या शिंदेंच्या शिवसेनेत असलेले शिवाजीराव आढळराव पाटील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत येऊन निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यातही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. उमेदवार ठरला असून निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगतील, असं आढळराव पाटील यांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसतोय.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून विरोध
आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतूनच विरोध होतोय. खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी आढळराव यांना उमेदवारी दिल्यास राजकारण सोडण्याची भाषा केली आहे. गेल्या २० वर्षांपासून आढळराव पाटील आणि दिलीप मोहिते यांच्यात राजकीय वैर आहे. तर अजित पवारांचे नीकटवर्तीय भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही या उमेदवारीला विरोध केला आहे. उमेदवार आयात करण्यापेक्षा भाजपाच्या महेश लांडगे यांना उमेदवारी द्या, अ्सं सांगत त्यांनी आढळराव पाटील यांना विरोध दर्शवलाय.
राष्ट्रवादीतून उमेदवारीच द्यायची असेल तर दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते किंवा विलास लांडे यांना देण्यात यावी, अशी मागणी होतेय.
अजित पवारांच्या दौऱ्यात तुकडा पडणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमोल कोल्हे यांच्या होमपीचवर याबाबत चर्चा करुन निर्णय करण्याची शक्यता आहे. शिरूर आणि मंचर या ठिकाणी कार्यकर्त्यांचा व शेतकऱ्यांचा मेळावा अजित पवारांच्या उपस्थितीत होणार आहे. आंबेगाव तालुक्याचाही ते दौरा करणार आहेत. या दौऱ्यात नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. तसंच आढळराव पाटील यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णयही होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
हेही वाचा:नवनीत राणा आज भाजपात प्रवेश करणार?