नागपूर – अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटलंय. आज नागपुरात भाजपाचा मेळावा होणार आहे, या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित राहणार आहेत. नवनीत राणाही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळं या मेळाव्यात नड्डा यांच्या उपस्थितीत राणा या भाजपात येतील अशी चर्चा आहे.
काय म्हणाल्यात नवनीत राणा?
राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे भाजपासोबत असले तरी अद्याप अधिकृतपणे त्यांनी पक्षात प्रवेश केलेला नाही. अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना भाजपाच्या चिन्हावर तिकिट देण्यात येईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे राणा निवडणुकांपूर्वी भाजपात जातील असं सांगण्यात येतंय.
याबाबत नवनीत राणा यांना विचारणा केली असता, रवी राणा आणि आपल्याबाबत नेहमीच चर्चा होत असते. एनडीएचा घटक पक्ष असल्यानं भाजपाच्या नागपूरच्या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय, मात्र भाजपा प्रवेशाच्या प्रश्नावर योग्य वेळी निर्णय करु, असं उत्तर त्यांनी दिलंय. त्यामुळं राणा यांच्या भाजपा प्रवेशाचा सस्पेन्स वाढल्याचा मानण्यात येतंय.
राणांना संधी की अडसुळांना ?
अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्यात संघर्ष आहे. राणा भाजपासोबत आहेत, तर अडसूळ हे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. दोघंही अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर बोगस जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन अडसूळांनी न्यायालयात राणांना आव्हान दिलेलं आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणाचा निकाल येत्या काही दिवसांत सुप्रीम कोर्टात अपेक्षित आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय नवनीत राणा यांच्याविरोधात गेल्यास, त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत लढता येणार नाही, असा दावा करण्यात येतोय. त्यामुळं या निर्णयानंतरच राणा यांच्या भविष्याचा फैसला होईल असं सांगण्यात येतंय.
राणा विरुद्ध अडसूळ संघर्ष शिगेला
अमरावती मतदारसंघात गेल्या काही दिवसांत राणा विरुद्ध अडसूळ हा संघर्ष टोकाला पोहचलेला आहे. अमरावती मतदारसंघ शिवसेनेचा असल्यानं आपणच उमेदवार असू, असा दावा अडसूळांनी केलाय. तसंच नवनीत राणा यांना बच्चू कडू आणि भाजपातूनच विरोध असल्याचं अभिजित अडसूळ यांचं म्हणणं आहे. मित्रपक्ष म्हणूनही राणा यांनी आपल्या प्रचाराला येऊ नये, असंही अडसूळ सांगतायेत. आग्रही असलेल्या अडसुळांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे राणांना तिकिट दिल्यास, अडसूळ वेगळा मार्ग स्वीकारण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दुसरीकडे नवनीत राणा यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळेल, असा दावा राणा दाम्पत्याकडून करण्यात येतोय. येत्या काळात अडसूळ पिता-पुत्रांना आपला प्रचार करावा लागेल, असंही रवी राणा सांगतायेत.
हेही वाचा : मविआचं अखेर ठरलं, वंचितला लागणार लॉटरी?, काय आहे जागावाटपाचा फॉर्म्युला, घ्या जाणून