मुंबई– महाविकास आघाडीचा बहुप्रतिक्षित जागावाटपाचा तिढा सुटल्याचं मानण्यात येतंय. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर वंचित बहुजन आघाडी मविआत सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झालंय. बुधवारी मविआची जागावाटपाची बैठक होणार आहे. या बैठकीत वंचितचे पदाधिकारी सहभागी होणार नसले तरी त्याच दिवशी शरद पवारांची भेट प्रकाश आंबेडकर पुण्यात घेणार आहेत. या भेटीनंतर वंचित महाविकास आघाडीत असल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
काय आहे जागावाटपाचा फॉर्म्युला?
शिवसेनेशी आधीपासून युतीत असलेल्या वंचितने सुरुवातीला जागावाटपात १२-१२ च्या फॉर्म्युल्याची मागणी केली होती. प्रत्यक्ष मविआच्या बैठकीच्या आधी ही मागणी सहा जागांवर आली. मविआशी झालेल्या प्राथमिक चर्चेत आंबेडकरांना एक ते दोन जागा सोडण्यासाठीची तयारी होती. मात्र आंबेडकरांची मागणी जास्त आहे.
२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितला महाराष्ट्रात ७ टक्के मतं पडलेली आहे. महाविकास आघाडीसाठी ही मतं महत्त्वाची आहेत. वंचित स्वतंत्र लढल्यास, त्याचा फटका मविआला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अखेरीस शरद पवार यांनी यातून तोडगा काढल्याचं सांगण्यात येतंय.
वंचितला मिळणार सहा जागा?
शरद पवार यांनी बारामतीत वंचितला चार ते पाच जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. वंचितची मागणी सहा जागांची आहे. असं घडल्यास मविआतील जागावाटप कसं असेल त्यावर एक नजर टाकूयात.
मविआचं संभाव्य जागावाटप
- ठाकरे गट -18 जागा
- काँग्रेस-12 जागा
- शरद पवार-10 जागा
- वंचित- 5 ते 6 जागा
- राजू शेट्टी-1 जागा
- महादेव जानकर-1 जागा
साधारणपणे हा फॉर्म्युला निश्चित होईल, असं सांगण्यात येतंय.
महादेव जानकारांनाही पवारांची ऑफर?
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपापासून दूर होत, स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. जानकर जर महाविकास आघाडीत आले, तर पवारांनी त्यांची स्वत:ची माढ्याची जागा जानकरांना सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळं धनगर समाजाला ही जागा मविआत मिळू शकते. आता याबाबत जानकर काय निर्णय घेणार, हे पहावं लागणार आहे.
बुधवारी होणार अंतिम निर्णय
बुधवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: मेट्रो, कॅन्सर हॉस्पिटल, ओव्हरब्रिज, पर्यायी रस्ते, काय आहे मुख्यमंत्र्यांचं ‘मिशन कल्याण’?