नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासंदर्भात नियोजन सुरू केले आहे. संघाकडून प्रत्यक्षात राजकीय पक्षाचा प्रचार करण्यात येत नसला तरी संघाकडून मतदानवाढीसाठी पुढाकार घेतला जात आहे. लोकसभेसाठी संघ परिवारातर्फे विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.
यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून छोट्या बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांच्या माध्यमातून स्वयंसेवकांना सक्रियपणे काम करण्याचे निर्देश देण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर संघाच्या हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे. मतदान पूर्ण करून घेण्यासाठी लोकांना जाऊन भेटा आणि राष्ट्रहिताच्या विचारांना प्राधान्य देणाऱ्यांना निवडून आणण्याचे लोकांना आवाहन करा, असं निर्देश संघाकडून पदाधिकाऱ्यांना दिले जात आहे.
तालुका आणि जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांवर बैठका आणि इतर बाबींची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. २०२५ च्या विजयादशमीपासून संघाचे शताब्दी वर्ष सुरू होईल.
राममंदिरामुळे संघ स्वयंसेवकाचा देशभरात व्यापक जनसंपर्क झाला आहे. यानिमित्ताने ९० टक्के गावांमध्ये संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्षपणे पोहोचले आणि १९.३८ कोटी कुटुंबाना प्रत्यक्ष पवित्र अक्षता वाटप करण्यात आले. संघाच्या संकेतस्थळावरील जॉइन आरएसएसच्या लिंकवर २०१७ सालापासून दरवर्षी एक लाख रिक्वेस्ट आल्या आहेत. गेल्या वर्षी जाने-फेब्रुवारी महिन्यात हा आकडा १३ हजार १३७ पर्यंत पोहोचला. यंदा मात्र दोन महिन्यात २७ हजार ३६२ रिक्वेस्ट आल्या आहेत, अशी माहिती डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली.