पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून बाहेर पडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आढळराव पाटील शड्डू ठोकणार आहेत.
आज २६ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील.
अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना शिरूरमधून जिंकून येऊन दाखवा, असं चॅलेंज दिल्यानंतर त्यांच्या पक्षातून कोण निवडणूक लढवणार याबाबत उत्सुकता होती. अखेर आढळराव पाटील हाताला घड्याळ बांधून लोकसभेच्या रणागंणात प्रवेश करणार आहेत.
महायुतीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे. दरम्यान अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील या दोघांच्या पक्ष बदलाबाबत केलेल्या तुलनेवर पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 2019 ला कोल्हेंनी मारलेली बेडूक उडी आणि 2024 मी राष्ट्रवादीत करत असलेला प्रवेश… यात फरक आहे, असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. पुढे ते म्हणाले, शिरूरमध्ये माझ्या पाठीमागे पाच आमदार आहेत. अजित पावर यांची ताकद माझ्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती असा विश्वास पाटलांनी यावेळी व्यक्त केला.