X: @therajkaran
नागपूर:
राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा सदस्य माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसण्याच्या घटनेचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक झडली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी हा विषय उपस्थित केला. सत्ताधारी सदस्यांनीच मलिक यांच्या विरोधात पूर्वी केलेल्या वक्तव्यांचे स्मरण करून दिले. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी “तुमच्या नेत्यांनी ते कारागृहात असतांना मंत्रिपदावरून का वगळले नाही?” असा प्रश्न उपस्थित करत दानवे यांना टोला लगावला. देशद्रोही
सुटकेनंतर नवाब मलिक हे शरद पवार गट की सत्तेत गेलेल्या अजित पवार गट, कोणासोबत जातील यावरून चर्चा रंगल्या होत्या. मलिक हे आज हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात (Nagpur winter session) उपस्थित झाले. मात्र, त्यांनी अजित पवार यांच्या गटाच्या (Ajit Pawar group of NCP) बाकावर बसण्यास पसंती दिली. त्यावरून हा सभागृहात व बाहेरही चर्चेचा विषय झाला. त्याचेच पडसाद विधान परिषदेत उमटले.
विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की, विधानसभेचे एक सदस्य आज सत्ताधारी बाकावर बसले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. देशद्रोह्यांच्या (Traitor) ‘मांडीला मांडी’ लावून बसू शकत नाही, असे म्हणाले होते; पण आज तेच यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. अंबादास दानवे यांच्या या विधानावर सत्ताधारी बाकावरील मंत्री शंभुराज देसाई व इतर आमदारांनी गदारोळ केला. त्यावर संतप्त दानवे म्हणाले, मला बंधन घालणारे आपण कोण? या प्रकरणी आंतरराष्ट्रीय आतंकवादी कुख्यात दाऊद इब्राहिम याच्याशी कोणते व्यवहार झाले? एवढे जाणून घेण्याची इच्छा आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ म्हणाले, एका गोष्टीचे आश्चर्य आहे, ज्यांच्या नेत्यांनी ती व्यक्ती कारागृहात असताना मंत्रिपदावरून काढले नाही, ते आता येथे वेगळी भूमिका मांडत आहेत.