माढा : शरद पवार गटाकडून भाजपला जबर झटका देण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपला मोठा धक्का आहे.
भाजपकडून माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र यामुळे मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उद्या २८ मार्च, गुरुवारी विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांसोबत मुंबईतील बैठकीत सामील होणार आहेत.
आज अमोल कोल्हे यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांची भेट घेतली. यानंतर मोहिते-पाटील शरद पवार गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदावारी न दिल्यामुळं मोहिते पाटील कुटुंब नाराज आहे.दरम्यान जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत. बाकी सर्व मोहिते पाटील परिवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाणार असल्याचे जयसिंह मोहिते पाटील म्हणाले त्यामुळं उद्याच धैर्यशील मोहिते पाटलांना प्रवेश देवून त्यांची माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
माढ्यात चुरशीची लढत…
माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर विरूद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून 1 लाखांहून अधिकचे मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळे मतदार संघात मोहिते पाटलांचे चांगले वजन असल्याचे सिद्ध झाले होते. सद्यस्थितीत निंबाळकर यांच्या पाठिशी माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, माण खटाव या तालुक्याचे आमदार आहेत.