X: @therajkaran
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) बड्या नेत्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करून काँग्रेसला (Congress) धक्का दिला आहे. येथील बडे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, माजी खासदार गजेंद्र सिंह राजुखेडी तसेच संजय शुक्ला, अर्जुन पालिया, विशाल पटेल व अन्य नेत्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव, मध्य प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी शर्मा तसेच माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. (Congress leaders joined BJP)
काँग्रेसमध्ये असताना माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत. ते मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. ते युवक काँग्रेसचेही राज्य अध्यक्ष राहिलेले आहेत. तर राजुखेडी हे आदिवासी समाजातील मोठे नेते मानले जातात. ते १९९८, १९९९ आणि २००९ अशा एकूण तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर धार या जागेवरून खासदार झालेले आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी ते भाजपात होते. १९९० साली ते भाजपाच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.
मागच्या महिन्यात जबलपूरच्या महापौरांसह १६ काँग्रेस नेत्यांनी देखील भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला होता. गेल्या महिन्यात अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir in Ayodhya) प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. काँग्रेसने श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारल्यामुळे ते पक्षावर नाराज होते. हेच काँग्रेस सोडून भाजपामध्ये सामील होण्याचे कारण असल्याचे जबलपूरचे महापौर जगतसिंग अन्नू यांनी सांगितले होते. त्यांनतर काँग्रेसमधील नेत्यांचे आउटगोइंग सुरूचं आहे.