X : @milindmane70
महाड
ज्या मनुस्मृतीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr Babasaheb Ambedkar) जाळली, तीच मनुस्मृती पुन्हा दहन करण्याच्या नादात महाडमधील क्रांती स्तंभावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांच्याकडून फाडला गेला. या घटनेचा महाडमधील आंबेडकर अनुयायांकडून जाहीर निषेध व्यक्त होत आहे. तर याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP faction of Sharad Pawar) गटाचे ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. मात्र याबद्दल महाडमध्ये सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
ज्या मनुस्मृतीला डॉ आंबेडकरांनी त्या काळात जाळले होते, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्याचा प्रयत्न महाडमधील डॉ आंबेडकर यांचा पावन स्पर्श झालेल्या क्रांती स्तंभावर (Kranti Stambh) घडला. स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये, अशा गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती, माणुसकीला काळीमा फासणारी मनुस्मृती पुन्हा जाळण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन क्रांती स्तंभावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आले होते.
पवार गटाचे कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सोबत आणलेल्या जनसमुदायासोबत दुपारी बाराच्या सुमारास क्रांति स्तंभावर दाखल झाले. डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व फुले अर्पण केल्यानंतर त्यांनी मनुस्मृतिबाबत आपले मत व्यक्त केले. त्यावेळी डॉ आंबेडकरांचा फोटो असलेले छायाचित्र सर्व कार्यकर्त्यांच्या हातात होते. मात्र मनुस्मृती जाळण्याअगोदरच हे चित्र फाडण्यात आले, हे चित्र फाडताना आ जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती व त्यांनी देखील स्वतःच्या हातून हे फोटो फाडले हे स्पष्टपणे दिसून आले. काही वेळातच आपली चूक झाली हे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी याबाबत जाहीर दिलगिरी व्यक्त केली. मात्र याबाबत महाडमधील आंबेडकर अनुयायांनी या झालेल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून जाहीर केला. आमदार आव्हाड यांच्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.