X : @nalavadeAnant
मुंबई – शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिउत्साही स्टंटबाज नेते जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडला आहे, हा संपूर्ण देशाचा, आंबेडकरी जनतेचा अपमान असून जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याचा मी जाहीर निषेध तर करतोच, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे (Shiv Sena spokesperson Dr Raju Waghmare) यांनी बुधवारी येथे एका घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना केली.
वाघमारे पुढे म्हणाले की, एकीकडे जय भीम म्हणायचे आणि दुसरीकडे बाबासाहेबांबद्दल मनात असलेला राग अशा प्रकारे बाहेर काढायचा, अशा दुहेरी मानसिकतेमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आव्हाड आहेत. या कृत्यानंतर आव्हाड यांचे माफी मागणे म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असून हे मगरीचे अश्रू आहे यांना काही किंमत नाही, असेही वाघमारे यांनी यावेळी स्पष्ट केले.
बाबासाहेबांचा फोटो आहे, असे त्यांचा कार्यकर्ता सांगत असताना सुद्धा आव्हाडांनी त्याकडे लक्ष न देता तो फोटो फाडला हा मूर्खपणा आहे आणि या मूर्खपणाबद्दल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल व्हावाच, अशी आमची शिवसेना पक्षातर्फे सरकारकडे मागणी आहे, असे डॉ वाघमारे म्हणाले. डॉ. आंबेडकरांचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. मग तो कितीही मोठा नेता असला तरी त्यावर कारवाई झालीच पाहिजे, हे आमचे ठाम मत असल्याचे वाघमारे यांनी नमूद केले.