नवीन बस स्थानकाचे काम अपूर्ण; साचलेल्या पाण्यातूनच प्रवासी आणि एसटी बसची ये-जा
महाड : महाड शहराला दरवर्षी सावित्री नदीच्या पुराचा सामना करावा लागतो. मात्र यंदा पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच महाड एसटी बस स्थानक जलमय झाल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने प्रवाशांना पाण्यातूनच एसटी बसमध्ये चढ-उतार करावा लागत असून मोठी गैरसोय होत आहे.
सह्याद्री पर्वतरांगांतील महाड आणि पोलादपूर तालुक्यातील नद्या व नाले सावित्री नदीमार्गे खाडीत मिळतात. भरती आणि मुसळधार पावसामुळे महाडमध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. मात्र यंदा अवघ्या काही दिवसांच्या पावसानंतरच बस स्थानक परिसरात पाणी साचल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
नवीन बस स्थानकाचे काम अद्याप अपूर्ण
महाड येथील नवीन एसटी बस स्थानकाचे बांधकाम सुरू असले तरी ते पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. बस थांबण्यासाठीची जागा, डांबरीकरण आणि प्रवाशांसाठीच्या काही मूलभूत सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या जुन्याच बस स्थानकातून महाड, पोलादपूर तसेच ग्रामीण भागातील वाहतूक सुरू आहे. याच बस स्थानकातून मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल, बोरिवली, जळगाव, अक्कलकोट तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या एसटी बसचेही संचालन केले जाते.
पाण्यातूनच बसमध्ये चढ-उतार
रायगड विभागातील एसटी बस ज्या ठिकाणी उभ्या राहतात त्या संपूर्ण परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना पाण्यातूनच बसमध्ये चढावे आणि उतरावे लागत आहे. एसटी आगारातील वर्कशॉपकडे जाणाऱ्या बसनाही पाण्यातूनच मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. बस स्थानकातील कंट्रोलर केबिनसमोरील परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेवर प्रश्न
स्थानिक नागरिकांच्या मते, बस स्थानकात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी व्यवस्था नसल्याने प्रत्येक पावसात हीच परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पुढील तीन महिने काय?
महाड तालुक्यात आतापर्यंत सुमारे ५५० मिमी पावसाची नोंद झाली असून पावसाळ्याचा मुख्य कालावधी अजून बाकी आहे. अशा परिस्थितीत पुढील काही महिन्यांत मुसळधार पाऊस झाल्यास बस स्थानकातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

