टीवायबीकॉम प्रश्नपत्रिका गळतीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी; सीआयडी चौकशी न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
मुंबई: मुंबई विद्यापीठातील कथित टीवायबीकॉम अंतिम सत्राच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याबाबत राज्य सरकारने महाराष्ट्र विधानपरिषदेत स्पष्ट सूचना दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक झाली आहे. राज्य सरकारच्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सीआयडी चौकशी टाळली जात असल्याचा आरोप करत अभाविपने बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील कुलगुरूंच्या दालनासमोर जोरदार निदर्शने केली.
“पेपरफुटीतील दोषींना अभय देणे बंद करा”, “सीआयडी चौकशी तात्काळ करा” आणि “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या कथित निष्क्रियता, मौन आणि टाळाटाळीच्या भूमिकेचा निषेध नोंदवत या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी केली.
अभाविपने प्रश्न उपस्थित केला की, राज्य सरकारने स्पष्ट सूचना दिल्यानंतरही मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि व्यवस्थापन परिषद सीआयडी चौकशीपासून दूर का पळत आहे? पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणात चौकशीला विरोध करण्यामागे कोणते हितसंबंध आहेत आणि नेमके कोणाला संरक्षण दिले जात आहे, याचे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने द्यावे, अशी मागणी संघटनेने केली.
संघटनेने असेही म्हटले की, टीईटीसारख्या इतर परीक्षा गैरव्यवहारांच्या प्रकरणांत तातडीने कठोर कारवाईची भूमिका घेतली जाते. मात्र, स्वतःच्या विद्यापीठातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित टीवायबीकॉम पेपरफुटीप्रकरणी प्रशासनाचे मौन आणि उदासीनता अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित कोणतीही पेपरफुटी कमी-अधिक गंभीर असू शकत नाही आणि या प्रकरणाचीही स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका अभाविपने मांडली.
अभाविपच्या मते, राज्य सरकारची स्पष्ट सूचना मिळाल्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही, अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही आणि सीआयडी चौकशीबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित इतक्या गंभीर प्रकरणात प्रशासनाचे मौन हे उत्तरदायित्व टाळण्याचे प्रतीक असल्याची भावना विद्यार्थी वर्गात निर्माण झाल्याचा दावा संघटनेने केला.
अभाविपने इशारा दिला की, या प्रकरणात पारदर्शक चौकशी करण्याऐवजी सातत्याने टाळाटाळ केली गेल्यास मुंबई विद्यापीठाच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. विद्यार्थ्यांच्या न्यायाशी तडजोड करणारी कोणतीही भूमिका सहन केली जाणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
अभाविपची मागणी आहे की, टीवायबीकॉम पेपरफुटी प्रकरणाची तात्काळ सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, मुख्य सूत्रधारांसह सर्व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि राज्य सरकारच्या सूचनेची अंमलबजावणी का करण्यात आली नाही, याचा खुलासा विद्यापीठ प्रशासनाने करावा. अन्यथा राज्यव्यापी आणि अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला.
अभाविपचे मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी म्हणाले, “राज्य सरकारने महाराष्ट्र विधानपरिषदेत सीआयडी चौकशीची स्पष्ट सूचना दिल्यानंतरही मुंबई विद्यापीठाने त्याकडे दुर्लक्ष केले. ही केवळ प्रशासकीय हलगर्जी नसून सत्य दडपण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर संशय निर्माण होतो. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही अभय मिळू देणार नाही. सीआयडी चौकशी सुरू होईपर्यंत, प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई होईपर्यंत आणि संपूर्ण सत्य जनतेसमोर येईपर्यंत अभाविपचा संघर्ष अधिक तीव्रतेने सुरू राहील.”
(टीप : या वृत्तातील आरोप आणि मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर आधारित आहेत. या संदर्भात मुंबई विद्यापीठ प्रशासनाची भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

