मुंबई
राज्य शासनाने सारथी, बार्टी, महाज्योतीकडून पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येते. यासाठी आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षेत सीलबंद प्रश्नपत्रिका आणि सील नसलेल्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर पेपरफुटीचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घातला. त्यावर संतप्त विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे सारथी कार्यालयावर मोर्चा काढला. काही विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. परीक्षेत गोंधळ होण्यास जबादार असणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
यानंतर आता युवक काँग्रेसकडून या पेपरफुटी प्रकरणात आंदोलन पुकारण्यात आलं आहे. तलाठी भरती घोटाळ्याची SIT चौकशी करा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी ट्विट केलं आहे.
यावेळी त्यांनी भाजपवर धक्कादायक आरोप केला आहे, इतके दिवस आमदार फोडण्यात निष्णात असलेले सरकार आता विविध परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या टोळीला संरक्षण देण्यात निष्णात झाल्याचे दिसत आहे आणि त्याविरोधात जे आवाज उठवत आहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत तलाठी भरती घोटाळ्यांची SIT चौकशी होत नाही महाराष्ट्रभर युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशा शब्दात त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.